धक्कादायक! भावंडांना घराबाहेर काढून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:44 IST2022-06-27T17:43:41+5:302022-06-27T17:44:15+5:30
Sexual Abuse : तरोडा येथील घटनेने खळबळ, विकृत आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धक्कादायक! भावंडांना घराबाहेर काढून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
वर्धा : भावंडांना जबरदस्तीने घराबाहेर काढून अवघ्या १२ वर्षीय मुलीचे शोषण करुन अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक अन् लाजिरवाणी घटना तरोडा गावात घडली. या प्रकरणात हिंगणघाट पोलिसांनी तत्काळ दखल घेत विकृत आरोपीला बेड्या ठोकून पोलिसी हिसका दाखवला. १२ वर्षीय मुलगी तिच्या भावंडांसोबत घरी खेळत होती. दरम्यान आरोपी आरजू राजू खंडाळकर (२०) रा. तरोडा हा घरी आला आणि मुलीला पिण्यास पाणी मागितले.
मुलगी पाणी आणण्यास जाताच आरोपी आरजूने घरात शिरुन खेळत असलेल्या तिच्या भावंडांना जबरदस्तीने घराबाहेर काढून दिले आणि मुलीला प्रसाधनगृहाकडे खेचत नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने आरडाओरड केली असता परिसरातील महिला व तिच्या भावंडांनी धाव घेतली असता आरोपी आरजू खंडाळकर याने तेथून पळ काढला. घाबरलेल्याग् मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने मुलीला सोबत घेत थेट हिंगणघाट पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली.
पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य पाहून तत्काळ तपासचक्र फिरवून विकृत आरोपी आरजूला अटक करुन बेड्या ठोकल्या. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी भेट देत पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक के.एम. पुंडकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, पोलीस उपनिरीक्षक पपीन रामटेके करीत आहे.