धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:20 IST2025-06-10T14:19:40+5:302025-06-10T14:20:35+5:30
या मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, तिच्या पायात जोडवी आणि भांगात सिंदूर असल्याने ती विवाहित असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
गाझियाबादच्या लोणी बॉर्डर परिसरातील शिव वाटिकाजवळच्या एका कालव्याजवळ एका सुटकेसमध्ये सुमारे २६ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा खून अन्यत्र करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांनी या परिसरातील कालव्याच्या काठावर एक बेवारस हिरव्या रंगाची सुटकेस पाहिली. त्यांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ लोणी बॉर्डर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सुटकेस उघडल्यावर त्यांना आतमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेची मान पूर्णपणे मोडलेली होती आणि तिच्या नाक व तोंडातून रक्त वाहत होते, ज्यामुळे तिला अमानुष मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसत होते.
ओळख पटवण्याचे आव्हान आणि बलात्काराचा संशय
या मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, तिच्या पायात जोडवी आणि भांगात सिंदूर असल्याने ती विवाहित असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, प्रथमदर्शनी हा बलात्कार करून खून केल्याचा प्रकार वाटत आहे. शवविच्छेदनानंतरच यामागील सत्य समोर येईल.
फॉरेन्सिक टीमने आवश्यक नमुने केले गोळा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले. फॉरेन्सिक टीमने आवश्यक नमुने गोळा केले आहेत. एसएपी अजय कुमार सिंह यांनी माहिती दिली की, नियंत्रण कक्षाकडून बेहटा हाजीपूरहून बांधल्या जाणाऱ्या कालव्याच्या रस्त्याच्या कडेला सुटकेसमध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीस आता आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून मृतदेह कोणी आणला आणि सुटकेसमध्ये कोणी टाकला याचा शोध घेता येईल. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.