शिवसैनिकांचा गोंधळ; वसईच्या मॉलमध्ये पाकिस्तानी उत्पादनांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 19:20 IST2019-01-24T19:18:50+5:302019-01-24T19:20:21+5:30
मॉलच्या व्यवस्थापनाने चुकून या वस्तू विक्रीसाठी आल्याचे सांगत त्यांची विक्री थांबवली आणि तणावपूर्ण वातावरण शांत झाले.

शिवसैनिकांचा गोंधळ; वसईच्या मॉलमध्ये पाकिस्तानी उत्पादनांची विक्री
वसई - वसईतील एका मॉलमध्ये पाकिस्तानी उत्पादनांची विक्री होत असल्याचे समजल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मॉलबाहेर गोंधळ घातला. पाकिस्तांनी उत्पादनावर बंदी नसल्याचे पोलिसांनी सांगत जमावाला शांत केले. मात्र, मॉलच्या व्यवस्थापनाने चुकून या वस्तू विक्रीसाठी आल्याचे सांगत त्यांची विक्री थांबवली आणि तणावपूर्ण वातावरण शांत झाले.
वसई पश्चिमेकडील एका मॉलमध्ये पाकिस्तानी कंपनीने तयार केलेली मसाले आणि हवाबंद खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे एका ग्राहकाला आढळून आले. या उत्पादनावर पाकिस्तानी कंपनीचे नाव आणि पत्ता होता. ही बाब शिवसैनिकांना समजताच त्यांनी मॉलच्याबाहेर जमून आंदोलन सुरू केले. पाकिस्तान निषेधाच्य़ा घोषणा देत या वस्तूंची विक्री थांबविण्याची मागणी शिवसैनिक करू लागले. परिस्थिती तणाव पाहून वसई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाकिस्तांनी वस्तू विकण्यास बंदी नसल्याचे पोलिसांनी आंदोलकांना सांगितले. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांत किरकोळ बाचाबाची झाली. दरम्यान, मॉल व्यवस्थापकाने चुकून पाकिस्तानी वस्तू विक्रीसाठी आल्याचे सांगत माफी मागितली आणि त्वरीत या वस्तूंची विक्री थांबविण्यात आल्याचे जाहीर केले. पाकिस्तानी वस्तू विक्रीवर निर्बंध नाहीत. त्यामुळे आम्ही मॉल व्यवस्थापनावर कारवाई कऱण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.