रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:11 IST2025-09-26T09:11:05+5:302025-09-26T09:11:39+5:30
पतीच्या मारहाणीला कंटाळलेल्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची नवी दिशा शोधली. मात्र...

AI Generated Image
पतीच्या मारहाणीला कंटाळलेल्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची नवी दिशा शोधली. मात्र, तिला मिळालेला आधार खोटा ठरला. इंस्टाग्रामवर सुरू झालेली मैत्री, प्रेमसंबंध आणि नंतर ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने सोशल मीडियाच्या धोक्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
लखनऊमधील पीजीआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेने सांगितले की, तिचा पती रोज तिला मारहाण करतो. त्याच्या या वागण्याला कंटाळून तिने सोशल मीडियावर मन रमवायला सुरुवात केली. याच दरम्यान, इंस्टाग्रामवर एका तरुणासोबत तिची मैत्री झाली. महिलेने तिच्या मनातील सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. पतीच्या छळापासून ते तिच्या वेदनांपर्यंत, सर्व काही ती त्याच्यासोबत शेअर करू लागली.
हळूहळू दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यानंतर रोज ते फोनवर बोलू लागले. बोलता-बोलता त्या तरुणाने व्हिडीओ कॉलवर बोलण्याचा आग्रह धरला. रात्रीच्या वेळी जेव्हा पती झोपलेला असायचा, तेव्हा ती त्याच्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलायची.
व्हिडीओ कॉलचे झाले अश्लील व्हिडीओ!
त्या तरुणाने लग्नाचे वचन देऊन महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमात वेड्या झालेल्या महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. याच दरम्यान, त्याने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून महिलेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले.
एकदा त्या तरुणाने महिलेकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेने त्याला सांगितले की, तिच्याकडे एवढे पैसे नाहीत. पण तिच्याकडे पैसे नाहीत म्हटल्यावर, त्याने खरोखरच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
पोलिसांत दाखल केली तक्रार
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर महिलेला मोठा धक्का बसला. तिने घाबरून पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मी फक्त न्याय मिळावा अशी मागणी करत आहे, असे महिलेने म्हटले.