सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:44 IST2025-07-16T11:25:49+5:302025-07-16T11:44:03+5:30

Crime UP : एका मातेनेच आपल्या सहा वर्षांच्या  निरागस मुलीची निर्घृण हत्या केली आणि तब्बल ३६ तास तिचा मृतदेह घरातच ठेवला.

She killed her six-year-old daughter and left her body rotting in the house! Why was the mother so cruel? | सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?

AI Generated Image

काळजाला पीळ पाडणाऱ्या एका घटनेने लखनऊ शहर हादरून गेलं आहे. एका मातेनेच आपल्या सहा वर्षांच्या  निरागस मुलीची निर्घृण हत्या केली आणि तिचा दोष पतीवर ढकलण्याचा प्रयत्न केला. तब्बल ३६ तास निष्पाप मुलीचा मृतदेह घरात सडत राहिला, पण आईने कोणालाही कानोकान खबर लागू दिली नाही. अखेर, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि पोलिसांच्या कसून तपासामुळे रोशनी खान नावाच्या या क्रूर मातेचा आणि तिच्या प्रियकर उदित जयस्वालचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून, या घटनेमागे दडलेले कटकारस्थान आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मॉडर्न लाईफस्टाईलची आस 
हे धक्कादायक प्रकरण लखनऊच्या कैसरबाग परिसरातील आहे. येथील रहिवासी शाहरुख खानचे लग्न आठ वर्षांपूर्वी रोशनी नावाच्या मुलीशी झाले होते. रोशनी आधुनिक विचारांची होती; तिला पार्ट्या, क्लब्स आणि डान्सची आवड होती. सुरुवातीला शाहरुखला हे सर्व ठीक वाटले, पण हळूहळू दोघांमध्ये मतभेद वाढू लागले आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना एक गोड मुलगी झाली, पण रोशनीच्या जीवनशैलीत कोणताही बदल झाला नाही. याच काळात, एका क्लब पार्टीमध्ये तिची ओळख उदित जयस्वालशी झाली. भेटीगाठी वाढल्या, जवळीक वाढली आणि लवकरच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. रोशनी पतीला सोडून उदितसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली आणि सोबत मुलीलाही घेऊन आली.

फ्लॅट हडपण्याचा डाव आणि पतीला फसवण्याचा कट
रोशनीने शाहरुखचा फ्लॅट हडपण्याच्या उद्देशाने पतीवर आणि त्याच्या कुटुंबीयांवर मारहाणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल केले होते. यामुळे शाहरुखच्या कुटुंबीयांना तुरुंगातही जावे लागले. नंतर दोघांमध्ये समझोता झाला, तेव्हा रोशनीने फ्लॅटवर पूर्ण ताबा मिळवला आणि शाहरुखला बाहेर काढले. तिला शाहरुखला पूर्णपणे संपवून प्रियकर उदितसोबत त्या फ्लॅटमध्ये आरामात राहायचे होते, यासाठी ती एक मोठा कट रचत होती.

रागाच्या भरात घेतला पोटच्या गोळ्याचा जीव!
घटनेच्या दिवशी, म्हणजेच सोमवारी रात्री, शाहरुख आपल्या मुलीला भेटण्यासाठी फ्लॅटवर पोहोचला होता. याचवेळी रोशनी आणि शाहरुख यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाच्या भरातच रोशनीने रागाच्या भरात आपल्याच निरागस मुलीचा गळा आवळला आणि तिचा जीव घेतला. त्यानंतर, तिने आपल्या पतीला म्हणजेच शाहरुखला या हत्येप्रकरणी अडकवण्याचा भयानक कट रचला.

३६ तासांनी उघड झाले सत्य
रोशनीने दुसऱ्या दिवशी शाहरुखवर हत्येचा आरोप करताच पोलिसांना संशय आला. मृतदेहाची स्थिती पाहून ती हत्या काही तासांपूर्वीची नसून, अधिक जुनी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. शिवाय, चौकशीदरम्यान रोशनी सातत्याने आपले जबाब बदलत होती आणि प्रत्येक प्रश्नावर पोलिसांची दिशाभूल करत होती.

अखेर, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर संपूर्ण सत्य उघड झाले. रिपोर्टमध्ये मुलीची हत्या ३६ तासांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी, लोकेशन तपासले असता, हत्येच्या वेळी शाहरुख त्या परिसरात नव्हता हे सिद्ध झाले. यामुळे रोशनी आपल्याच जाळ्यात अडकली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. प्रियकर उदितनेही या कटात आपला सहभाग मान्य केला आहे. एका निष्पाप मुलीला केवळ आईच्या स्वार्थापायी जीव गमवावा लागला. 

Web Title: She killed her six-year-old daughter and left her body rotting in the house! Why was the mother so cruel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.