संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 08:30 IST2025-12-08T08:30:02+5:302025-12-08T08:30:26+5:30
संसार टिकावा यासाठी एका विवाहितेने पतीकडून होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार वर्षानुवर्षे सहन केले. पण..

AI Generated Image
संसार टिकावा, लोकलाज राखली जावी आणि कुटुंबाचे नातेसंबंध जपले जावे, यासाठी एका विवाहितेने पतीकडून होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार वर्षानुवर्षे सहन केले. पण, जेव्हा पतीने क्रूरतेची हद्द ओलांडली, तेव्हा महिलेने थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. पतीने जिवे मारण्याची धमकी दिलेले 'ऑडिओ रेकॉर्डिंग' तिने एसपींना ऐकवले. या गंभीर तक्रारीनंतर नंदगंज पोलिसांनी पतीसह एकूण चार आरोपींविरोधात भादंवि आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे गाझीपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती अनेक वर्षांपासून पतीच्या अत्याचारांना तोंड देत होती. बदनामी टाळण्यासाठी ती गप्प राहिली. मात्र, ऑक्टोबर २०२५ मध्ये तिच्या घरात एक धक्कादायक घटना घडली. तिचा पती, त्याची गर्लफ्रेंड आणि त्या गर्लफ्रेंडचा पती हे तिघेही अचानक घरी आले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्या तिघांनी मिळून तिला अमानुषपणे मारहाण केली. इतकेच नव्हे, तर मारहाण केल्यानंतर तिला घरातून हाकलून देण्यात आले. अखेर, परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पीडितेने आपल्या भावाला बोलावून घेतले आणि ती त्याच्यासोबत माहेरी गेली.
माहेरातही सुटका नाही!
माहेरी गेल्यानंतरही या महिलेच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. तिचा पती तिला वेगवेगळ्या अनोळखी नंबरवरून फोन करत सतत धमक्या देत राहिला. "मी तुला जिवे मारून टाकीन," असे तो फोनवर वारंवार बोलत होता. एवढेच नाही, तर "जर तुला सासरी परत यायचे असेल, तर माहेरून पैसे घेऊन ये," अशी मागणीही त्याने केली. या धमक्यांमुळे विवाहिता अत्यंत भयभीत झाली.
ऑडिओ रेकॉर्डिंग ठरला निर्णायक पुरावा
पतीच्या या वाढत्या धमक्या आणि पैशांची मागणी ऐकून महिलेने एक मोठा निर्णय घेतला. तिने पतीच्या फोनवरील धमकीचे ऑडिओ रेकॉर्डिंग करून ठेवले. हा पुरावा घेऊन तिने सर्वप्रथम गाझीपूरचे पोलीस अधीक्षक (एसपी) यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. त्यानंतर, तिने महिला कक्ष, गाझीपूर येथेही तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर नंदगंज पोलीस ठाण्यात तत्काळ कारवाई करण्यात आली.
पीडितेचा पती, त्याची गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंडचा पती आणि अन्य एका व्यक्तीसह चार जणांविरुद्ध बीएनएसच्या कलम ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (४) तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियमच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.