अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ, मुंबईतील अग्निशमन जवानाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 18:48 IST2018-07-28T18:47:57+5:302018-07-28T18:48:36+5:30
८ वर्षीय मुलाच्या लैंगिक शोषणाप्रकरणी चेंबूर पोलिसांनी केली हि कारवाई

अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ, मुंबईतील अग्निशमन जवानाला अटक
मुंबई - चेंबूर येथे एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. चेंबूरपोलिसांनी डोंगरी येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेल्या ५७ वर्षीय जवानाला बेड्या ठोकल्या आहेत. एका ८ वर्षीय मुलाच्या लैंगिक शोषणाप्रकरणी चेंबूर पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
चेंबूर परिसरात आरोपीच्या शेजारी राहणाऱ्या ८ वर्षांचा चिमुकला आरोपीच्या घराबाहेर खेळत होता. तो खेळत असताना त्याच्याकडे धाव घेत आरोपीने त्या चिमुकल्याशी अश्लील चाळे केले आणि याबाबत कोणाकडे वाच्यता केलीस तर पुन्हा तेच करेन अशी धमकी आरोपीने चिमुकल्याला दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलाने आई - वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर चेंबूर पोलिसांनी आरोपी असलेल्या अग्निशमन दलातील ५७ वर्षीय जवानाला अटक केली असल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांनी दिली. आरोपीविरोधात पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.