नोकराचा कारनामा! ४ दिवसांपूर्वीच कामावर आला अन् एक कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मारून गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 14:18 IST2025-03-18T14:18:17+5:302025-03-18T14:18:29+5:30
संजय गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की, चार दिवसांपूर्वी त्यांनी एका प्लेसमेंट एजन्सीमार्फत नागार्जुन नावाच्या नोकराला कामावर ठेवलं होतं.

नोकराचा कारनामा! ४ दिवसांपूर्वीच कामावर आला अन् एक कोटीच्या दागिन्यांवर डल्ला मारून गेला
राजधानीतील शाहदरा भागातील एका घरातून १ कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या नोकर आणि त्याच्या मित्राला पोलिसांनीअटक केली आहे. सुरेश मलिक उर्फ नागार्जुन आणि त्याचा साथीदार रोहित कुमार मलिक अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की दोघांविरुद्ध यापूर्वीही असेच गुन्हे दाखल आहेत.
नोकराला ४ दिवसांपूर्वी ठेवलं होतं कामावर
डीसीपी प्रशांत गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी शाहदरा पोलिसांना तक्रार मिळाली. तक्रारदार संजय गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की, चार दिवसांपूर्वी त्यांनी एका प्लेसमेंट एजन्सीमार्फत नागार्जुन नावाच्या नोकराला कामावर ठेवलं होतं. त्याचं पोलीस व्हेरिफिकेशनही झालं नव्हतं. त्याने घरी काम करायला सुरुवात केली. याच दरम्यान १४ मार्च रोजी कुटुंब होळी साजरी करण्यासाठी गुरुग्रामला गेलं होतं. १५ मार्च रोजी दुपारी ते घरी आले तेव्हा चोरी झाल्याचं उघडकीस आलं.
एक कोटीचे सोन्याचे, हिऱ्यांचे दागिने गायब
घरातून सहा लाख रोख रक्कम आणि सुमारे एक कोटी किमतीचे सोन्याचे, हिऱ्यांचे दागिने गायब असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. डीसीपीच्या म्हणण्यानुसार, १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीच्या हालचाली तपासण्यात आल्या आणि शोध घेण्यात आला.
दोन जणांना अटक
आरोपीचे ओळखपत्रही बनावट असल्याचं आढळून आलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलीस पथकाने दिल्लीतील लाडो सराई येथून नागार्जुनला अटक केली. नंतर त्याचा दुसरा साथीदार रोहित कुमार मलिक याला अटक करण्यात आली. दोघेही ओडिशाचे रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला मालही जप्त केला आहे.