प्रसिद्ध रॅपर डॅरेल काल्डवेलच्या हत्येमुळे खळबळ; लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 21:45 IST2021-12-20T21:44:44+5:302021-12-20T21:45:35+5:30
Famous rapper Darrell Caldwell Murder : रॅपरच्या चाहत्यांसमोर मारेकऱ्याने त्याच्यावर हल्ला केला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित केलं.

प्रसिद्ध रॅपर डॅरेल काल्डवेलच्या हत्येमुळे खळबळ; लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान हल्ला
'ड्रॅको द रुलर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध रॅपर डॅरेल काल्डवेलच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. लॉस एंजेलिसमध्ये लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. रॅपरच्या चाहत्यांसमोर मारेकऱ्याने त्याच्यावर हल्ला केला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित केलं.
रॅपरचे ‘पब्लिसिस्ट’ स्कॉट जॉसन यांनी रविवारी न्यूयॉर्क टाइम्स आणि रोलिंग स्टोनला कॅल्डवेलच्या मृत्यूची माहिती दिली. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, २८ वर्षीय प्रसिद्ध रॅपर काल्डवेल यांच्यावर 'वन्स अपॉन अ टाइम इन L.A.' कॉन्सर्ट दरम्यान रात्री हल्ला झाला होता. याच कार्यक्रमात स्नूप डॉग, 50 सेंट आणि आइस क्यूब देखील त्यांचे परफॉर्मन्स सादर करणार होते, परंतु या हल्ल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरी आणि गोंधळामुळे आयोजकांनी इतर सर्व कार्यक्रम रद्द केले.
कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलचा हवाला देत 'बेअर बोनस'ने एका वृत्तात म्हटले आहे की, सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंचावर हाणामारी झाली, ज्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मात्र, त्यावेळच्या या हल्ल्याच्या बातमीत काल्डवेलचे नाव आले नव्हते.
आतापर्यंत कोणतीही अटक नाही
लॉस एंजेलिस पोलीस विभागाचे अधिकारी लुईस गार्सिया यांनी लॉस एंजेलिस टाईम्सला सांगितले की, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्याचवेळी, रॅप गायक स्नूप डॉगने सोशल मीडियावर काल्डवेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
या हल्ल्यात आपल्या आवडत्या गायकाचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून चाहते दुःखी झाले. संगीत मैफलीत अचानक घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावरही प्रतिक्रिया उमटत आहेत. डॅरेल काल्डवेलचे चाहते हताश आहेत जे त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. काही तासांपूर्वी स्पॅनिश गायक कार्लोस मारिन यांच्या निधनाची बातमी ऐकून संगीतप्रेमी चक्रावले होते.