दुसऱ्याच्या पत्नीस मॅसेज पाठवणाऱ्या इसमाला बदडले; भाईदरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 12:59 IST2021-09-18T12:59:08+5:302021-09-18T12:59:20+5:30
भाईंदर पश्चिमेच्या दीडशे फूट मार्ग, डिमार्ट जवळ वालचंद दर्शन ही इमारत आहे.

दुसऱ्याच्या पत्नीस मॅसेज पाठवणाऱ्या इसमाला बदडले; भाईदरमधील घटना
मीरारोड - एकाच इमारतीत राहणाऱ्या एका इसमाने दुसऱ्याच्या पत्नीस पाठवलेल्या मॅसेज वरून चांगलाच राडा झाला. तुझ्या पतीने मला मॅसेज का पाठवला ? असा जाब एका विवाहितेने त्या पतीच्या पत्नीस विचारल्या वरून झालेला वाद हाणामारी पर्यंत पोहचल्याची घटना भाईंदरच्या एका इमारतीत घडली आहे.
भाईंदर पश्चिमेच्या दीडशे फूट मार्ग, डिमार्ट जवळ वालचंद दर्शन ही इमारत आहे. हा परिसर काहीसा उच्चभ्रू वस्तीचा म्हणून ओळखला जातो. पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी नुसार, सदर इमारतीच्या बी विंग मध्ये अमित प्रविणचंद शहा (४१) हे पत्नी तेजल (३६) व दोन मुलांसह राहतात. १४ सप्टेंबर रोजी रात्री अमित हे पत्नीसह त्यांच्या इमारतीतल्या सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त भोजन समारंभात भोजन करुन इमारतीच्या पाठीमागे फोनवर बोलत बोलत होते. बोलता बोलता ते पत्नीसह इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारा वर पोहचले. त्यावर ए विंग मध्ये राहणारे अनिल पृथ्वीराज जैन हे त्यांची पत्नी मंजु सह आले व आवाज देऊन थांबवण्यास सांगितले.
मंजुने तेजलला जाब विचारला की, तुझ्या पतीने माझ्या मोबाईलवर मँसेज का पाठविला ?. त्यावरून तेजलने मंजुला कसला मँसेज आहे मला दाखव असे सांगितले. त्यावेळी अनिल ने अमितची काँलर पकडुन बाहेर येण्यास सांगितले. बाचाबाची होऊन अनिलने शिवीगाळ करत अमितला भिंतीवर ढकलले तसेच हेल्मेटने व ठोशाबुक्क्यांनी बेदम चोपले.
मंजू व प्रशांत जैन यांनी देखील अमितला बदडले. मंजु हिने तेजलच्या सुद्धा गालावर चापट लगावली. इमारती मधील दोन कुटुंबातील राडा पाहून अन्य राहिवाश्यानी मारामारी सोडवली . या मारहाणीत अमितचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादी वरून १५ सप्टेंबर रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात अनिल व त्याची पत्नी मंजू जैन आणि प्रशांत जैन या तिघांवर विविध कलमां खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.