'ये लंबू' म्हणणे बेतले मित्राच्या जीवावर; भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 20:11 IST2021-08-10T20:07:36+5:302021-08-10T20:11:37+5:30
Murder Case : भिवंडीतील धक्कादायक प्रकार

'ये लंबू' म्हणणे बेतले मित्राच्या जीवावर; भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केल्याने खळबळ
भिवंडी - मित्रांमध्ये उभे असताना मस्करी सुरु असतानाच 'ये लंबू' म्हणणे एका मित्राच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकास लंबू म्हणताच आरोपी मित्राने मित्राची चाकूने भोसकून भररस्त्यातच हत्या केली. ही घटना भिवंडीतील नुरीनगर परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. मोहम्मद अजगर शेख उर्फ सन्नाटा ( वय २० रा. नुरीनगर, भिवंडी ) असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. तर त्यावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपी समीर शेख ( वय २१ , रा. आझाद नगर ) यास नागरीकांनी बेदम मारहाण केल्याने तो सुध्दा गंभीर जखमी असून त्यावर मुंबई सायन येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी समीर शेख या मुख्य आरोपीसह दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मृतक मोहम्मद अजगर हा कुटूंबासह भिवंडीतील नुरी नगर परिसरात राहतो. काही दिवसापूर्वी मृतक व आरोपी समीरमध्ये काही कारणावरून वाद होऊन भांडण झाले होते. त्यातच सोमवारी रात्रीच्या सुमारास मृतक मोहंमद अजगर याने आरोपी समीर यास ' ये लंबू ' म्हणून जोराने आवाज दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन झटापट झाली. त्यावेळी आरोपीसह त्याच्या साथीदारांनी भर रस्त्यातच मृतक मोहंमद अजगरला मारहाण करीत त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. ही घटना पाहून परिसरातील जमावाने आरोपी समीरला पकडून जबर मारहाण केली. जमावाच्या मारहाणीत आरोपी समीरही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य पाहता परिससरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी नितीन पाटील करीत आहेत.