लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 20:50 IST2025-08-17T20:50:05+5:302025-08-17T20:50:28+5:30
सौरभच्या मृत्यूला ९ दिवस झाले, पण त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलाच्या आठवणीत आईचे अश्रू थांबत नाहीत.

लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात २७ वर्षीय सौरभ तिवारी या तरूणाने लग्नाच्या ४५ दिवसांनी आत्महत्या केली आहे. तो हैदराबाद येथे नोकरी करत होता. गळफास घेऊन त्याने जीवन संपवलं. आत्महत्येआधी सौरभने त्याच्या आईला शेवटचा कॉल करून पत्नीला घटस्फोट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या सौरभच्या आत्महत्येचा गुंता सोडवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. कुटुंबाने सौरभच्या पत्नीवर परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे.
सौरभ तिवारीचं श्रेया नावाच्या मुलीसोबत लग्न झाले होते. २३ मे रोजी धुमधडाक्यात या दोघांचे लग्न पार पडले. सौरभ हैदराबाद येथे नोकरी करत होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तो हैदराबादला परतला. ८ ऑगस्टला सकाळी १० वाजता सौरभने आईला फोन केला. तेव्हा आई माझा घटस्फोट करून दे, मला आता जगायचं नाही असं ऐकताच सौरभची आई घाबरली. तिने मुलाला सर्व काही ठीक होईल असा धीर दिला. त्यानंतर दुपारी सौरभने आत्महत्या केल्याचं समोर आले. हैदराबाद येथे मित्रांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा सौरभ पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
सौरभच्या मृत्यूला ९ दिवस झाले, पण त्याच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलाच्या आठवणीत आईचे अश्रू थांबत नाहीत. माझा मुलगा साधा होता. लग्नानंतर तो चिंतेत राहू लागला. सून त्याला टोमणे मारायची, रोज फोनवर दुसऱ्या कुणाशी बोलत होती. मुलगा रडत रडत म्हणायचा, आई मी आता जगू शकत नाही. मी त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु तो हरला. माझ्या समोर माझा मुलगा गेला असं सौरभची आई सांगत होती. तर तरुण मुलाला गमावल्याने वडील कमलेश तिवारी संतापले होते. लग्नानंतर सून आणि तिच्या घरचे मुलाकडून वारंवार पैसे मागायचे, जमीन मागत होते. त्याच्याकडे १० लाख रूपये आणि ५ एकर जमीन मागितली होती. मी इतके पैसे कुठून आणू असं मुलगा मला विचारायचा असं त्याचे वडील म्हणाले.
दरम्यान, सौरभची बहीण शुभी तिवारी त्याच्या खूप जवळ होती. २ महिन्यापूर्वी माझ्या भावाचे लग्न झाले. सर्व खुश होते. पण माझ्या भावाला मारण्याचा कट रचला जातोय हे माहिती नव्हते. लग्नाआधीच श्रेयाचे अफेअर होते, तिच्या घरच्यांना हे माहिती होते तरीही त्यांनी माझ्या भावाशी तिचे लग्न लावले. लग्नानंतर ती आनंदी नव्हती. ती दुसऱ्या कुणाशी बोलत असायची. भावाने तिला विचारले, पण तिने माझे मन करेल, ते मी करणार असं त्याला सांगितले. आई वडिलांनी माझे जबरदस्तीने लग्न लावले असं वहिनीने सांगितले. भावाला तिच्यापासून घटस्फोट हवा होता, पण तिने तो देण्यास नकार दिला. अखेर त्याने कंटाळून आत्महत्या केली असा आरोप सौरभच्या बहिणीने केला आहे.
पत्नी श्रेयाने फेटाळले आरोप
मी सौरभला कधी धोका दिला नाही. मला माझ्या आई वडिलांचा मानसन्मान माहिती आहे. वडिलांनी मेहनतीने माझे लग्न लावून दिले होते. परंतु सासरचे मला हुंड्यासाठी छळत होते. सौरभची शारीरिक क्षमता कमी होती, त्याचा उल्लेख त्याने माझ्याकडे केला होता. मी त्याला डॉक्टरकडे दाखव म्हटले, त्यावर तो तुझं आयुष्य माझ्यामुळे खराब होईल असं म्हणायचा. २४ तासांमध्ये १८ तास मी पतीसोबत राहत होती, मग दुसऱ्याशी का बोलेन, मुलाचा कमीपणा लपवण्यासाठी माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत असं सौरभची पत्नी श्रेयाने म्हटलं.