संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपी विष्णू चाटेच्या मोबाइलमध्ये काय? ४ दिवसांची पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:45 IST2025-01-07T11:44:16+5:302025-01-07T11:45:35+5:30

सरपंच हत्येप्रकरणी तिघांना १३ दिवसांची कोठडी

Santosh Deshmukh murder case What's in accused Vishnu Chate mobile 4 days police custody | संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपी विष्णू चाटेच्या मोबाइलमध्ये काय? ४ दिवसांची पोलिस कोठडी

संतोष देशमुख हत्या प्रकरण: आरोपी विष्णू चाटेच्या मोबाइलमध्ये काय? ४ दिवसांची पोलिस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क, केज (जि. बीड) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूर हत्या केल्याच्या आरोपातील विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत, तर अन्य जयराम चाटे, महेश केदार व प्रतीक घुले या तीन आरोपींना १८ जानेवारीपर्यंत  १३ दिवस पोलिस कोठडीचे आदेश  केज न्यायालयाचे प्रमुख न्या. एस. व्ही. पावसकर यांनी सोमवारी दिले. दरम्यान, १८ डिसेंबरला विष्णू चाटे याला अटक करून त्याची पोलिस कोठडी घेतली असली तरी त्याने अद्याप आपला मोबाइल तपास अधिकाऱ्यांना दिलेला नाही. 

सरपंच हत्येप्रकरणी अटकेत असलेले जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार व खंडणीप्रकरणी अटकेत असलेला विष्णू चाटे या चारही आरोपींना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केज येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया केल्यानंतर दुपारी ३:०५ वाजता चौघांना केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. 

न्यायालयात सरकारी पक्षाचे वकील व आरोपीचे वकील यांनी आपापली बाजू मांडल्यानंतर केज येथील मुख्य न्या. एस. व्ही. पावसकर यांनी जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार या तिघांना १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी, तर आरोपींच्या वतीने ॲड. अनंत तिडके यांनी बाजू मांडली.

चाटेला ४ दिवसांची वाढीव कोठडी 

केज तालुक्यातील मस्साजोग शिवारातील अवादा एनर्जी कंपनीतील अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेशही मुख्य न्या. एस. व्ही. पावसकर यांनी दिले. 

दोन तास मांडली बाजू
nसरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडताना सरपंच हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, या प्रकरणात ऐनवेळी काही कलम वाढविण्यात आले आहेत.
nगुन्ह्यात वापरलेली सर्व हत्यारे जप्त करण्यासाठी तसेच  या गुन्ह्यातील पाळेमुळे शोधण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. तर आरोपीच्या वकिलाने याप्रकरणी राजकीय व सामाजिक दबाव वाढत असल्यामुळे दबावाखाली सर्व काही चालू आहे.
n२० ते २५ दिवस चौकशी अधिकाऱ्यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून आता पोलिस कोठडीची गरज नसल्याची बाजू ॲड. अनंत तिडके व ॲड. राहुल मुंडे यांनी मांडली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद  ग्राह्य धरून मुख्य न्या. एस. व्ही. पावसकर यांनी पोलिस कोठडी सुनावली.

मनोज जरांगेंवर चार ठिकाणी गुन्हे दाखल

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी परभणी येथे निघालेल्या मोर्चात  धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख करत  दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे भडकावू भाषण केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरुद्ध रविवारी परळी येथे व नंतर सोमवारी बीड येथील शिवाजीनगर, अंबाजोगाई आणि धारूर पाेलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रविवारी दुपारपासून ओबीसी व सकल वंजारी समाजातर्फे जरांगे व इतर राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत नागरिकांनी  ठिय्या धरला होता. तब्बल १२ तासांनंतर सोमवारी पहाटे वीरेंद्र सानप यांच्या तक्रारीवरून  जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Web Title: Santosh Deshmukh murder case What's in accused Vishnu Chate mobile 4 days police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.