Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:43 IST2025-06-04T09:43:27+5:302025-06-04T09:43:51+5:30
Sana Yousaf : पाकिस्तानमध्ये १७ वर्षीय टिकटॉकर सना युसूफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर खळबळ उडाली आहे.

Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
पाकिस्तानमध्ये १७ वर्षीय टिकटॉकर सना युसूफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर खळबळ उडाली आहे. इस्लामाबादचे पोलीस अधिकारी सैयद अली नासिर रिझवी यांनी या हत्येमागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. सनावर २२ वर्षीय मुलाने गोळ्या झाडल्या. कारण तिने मुलाची मैत्रीची ऑफर नाकारली होती. सना सतत नकार देत असल्याने मुलगा संतापला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं.
१७ वर्षांची सना ही लोकल स्टार होती. टिकटॉकवर तिचे ८ लाख फॉलोअर्स होते आणि ५ लाख लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करत होते. रिझवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय मुलाने वारंवार सनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने त्याला सतत नकार दिला. त्याला तिच्याशी मैत्री करायची होती. त्याने २९ मे रोजी सनाच्या वाढदिवशी तिच्याशी संपर्क साधण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केले.
पोलिसांनी आरोपीला केली अटक
मुलगा सनाच्या घरी पोहोचला आणि तिला सात ते आठ तास भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अयशस्वी झाला. त्यामुळेच तो संतापला आणि त्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याचा मोबाईल आणि पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. त्याने देखील आपण हत्या केल्याचं कबूल केलं.
सनाला दोन गोळ्या लागल्या
सनाच्या आईने सांगितलं की, संध्याकाळी पाच वाजता एक व्यक्ती हातात पिस्तुल घेऊन अचानक आमच्या घरात घुसला आणि मुलीवर त्याने गोळ्या झाडल्या. सनाला दोन गोळ्या लागल्या. ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.