Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:53 IST2025-11-05T16:51:39+5:302025-11-05T16:53:33+5:30
लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय सागरने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. आईच्या साडीनेच त्याने मृत्युला मिठी मारली. त्याच्या मृत्यूचे कारणही आता समोर आले आहे.

Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
Student Suicide News: 25 वर्षीय सागर लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने दिल्लीत कोचिंग क्लासेस लावलेले होते. १५ दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. कुटुंबासोबत तो नातेवाईकाच्या घरी लग्नाला गेला होता. तिथून आल्यानंतर त्याच्या खोलीत गेला आणि आईच्या साडीनेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरचे आले तेव्हा त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले असून, पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिच्या आईवडिलांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये घडली आहे. सागर सिंह असे मयत २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. सागरने मंगळवारी रात्री १० वाजता घरातच आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेजारी राहणारी तरुणी, छेडछाड आणि चार लाख
सागर आग्रामधील महादेव नगर परिसरात राहत होता. त्याने बीएससी पदवी घेतल्यानंतर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. पूर्व परीक्षा तो पास झाला होता आणि मुख्य परीक्षेची तयारी करत होता. १५ दिवसांपूर्वीच तो दिल्लीतून कोचिंग क्लासेस संपवून घरी आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर मागील काही काळापासून मानसिक तणावाखाली होता. शेजारी राहणाऱ्या एका तरुणीने त्याच्याविरोधात छेडछाड केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. यात सागरच्या आईवडिलांवरही आरोप करण्यात आले होते.
तरुणी आणि तिच्या आईवडिलांनी छेडछेडीची तक्रार मागे घेण्यासाठी सागरकडे चार लाख रुपये मागितले. त्यांनी ते दिले. पण, एफआरआय मागे घेतलीच नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा तीन लाख रुपये मागितले. त्यासाठी त्यांनी सागरच्या कुटुंबीयांना धमक्या देणं सुरू केले. त्यामुळे सागर नैराश्यात गेला.
सागरच्या खोलीत सापडली सुसाईड नोट
पोलिसांना सागरच्या खोलीत मृतदेहाबरोबरच एक सुसाईड नोटही मिळाली. त्यात त्याने तरुणी आणि तिचे आईवडील माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. याच सुसाईड नोटच्या आधारे आणि सागरच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार देणारी तरुणी आणि तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे.