ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:07 IST2025-07-14T14:07:12+5:302025-07-14T14:07:55+5:30

पोलिसांनी १२ वर्षापूर्वी एंड्रीवला ताब्यात घेतले होते परंतु पुरावे कमी पडल्याने त्याला सोडून दिले होते. ही पोलिसांची सर्वात मोठी चूक ठरली

Russia's most wanted serial killer, who 'raped & murdered 100 women' could be dead as cops find body | ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य

ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य

एक दशकाहून अधिक काळ ज्याचं नाव ऐकल्यावर लोक थरथर कापत होते. ज्याच्यावर १०० हून अधिक महिलांसोबत बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप होता. ज्याच्या कृत्याने परिसरात दहशत पसरली होती. ज्याला पोलिसांनी एकदा पकडले परंतु पुराव्या अभावी सोडून देण्यात आले. पोलिसांच्या या अकार्यक्षमतेमुळे अनेक निष्पापांचा बळी गेला. आता याच सीरियल किलरचा मृतदेह एका खदानीत सापडल्याने खळबळ माजली आहे.

ऑर्स्क मॅनियक असं या कुख्यात ट्रक ड्रायव्हर सीरियल किलरचे नाव आहे. रशियात वालेरी एंड्रीव नावाने तो ओळखला जायचा. एंड्रीववर २००६ ते २०१६ या काळात १०० हून अधिक महिला अपहरण, बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. हा परिसर कजाकिस्तान सीमेशी जोडलेला आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले तर एंड्रीव रशियातील सर्वात खतरनाक सीरियल किलर ठरेल. याआधी मिखाइल पोप्कोव याच्यावर ८१ हत्येचा आरोप आहे. 

१७ लाखाचे होते बक्षीस

पोलिसांनी १२ वर्षापूर्वी एंड्रीवला ताब्यात घेतले होते परंतु पुरावे कमी पडल्याने त्याला सोडून दिले होते. ही पोलिसांची सर्वात मोठी चूक ठरली. त्यानंतर पोलिसांनी अशा ८ गुन्ह्यांचा खुलासा केला ज्यात एंड्रीववर महिलांचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप होता. २०१३ पासून फरार एंड्रीव रशियातील मॉस्ट वॉन्टेड गुन्हेगार होता. त्यांच्या अटकेसाठी १५ हजार पाऊंड म्हणजे १७ लाखाचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. 

रहस्यमय मृतदेह आणि धक्कायक खुलासे

आता अक्कर्मानोवका परिसरात एका खदानीत सडलेला मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवली असता धक्कादायक खुलासा समोर आला. मृतदेहाची ओळख कलेक्शन ऑफ ९९ इंटरनॅशनल गेम्स असा लिहिलेला टी शर्ट, गडद रंगाची पॅन्ट यावरून झाली. विशेष म्हणजे या मृतदेहाचे सर्व दात सोन्याचे होते जे सीरियल किलर एंड्रीवशी मिळते जुळते होते. एंड्रीव हा शांत स्वभावाचा माणूस होता, लोकांसमोर त्याचे वागणे सामान्य होते असं त्याचे शेजारी सांगतात. २ मुलांचा बाप आणि जवळपास १५ वर्ष ट्रक ड्रायव्हर म्हणून तो जीवन जगत होता. परंतु त्याच्या ट्रकमध्ये कंडोम, महिलांची अंतर्वस्त्रे आणि हेअर क्लिपचा साठा मिळाल्याने एक भयानक सत्य समोर आले होते. त्याने अल्पवयीन मुलीसह अनेकांना शिकार बनवले होते. दरम्यान, पोलिसांना सापडलेला मृतदेह खरेच एंड्रीवचा आहे का याबाबत साशंकता आहे. त्यामुळे रशियन पोलीस हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. 
 

Web Title: Russia's most wanted serial killer, who 'raped & murdered 100 women' could be dead as cops find body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.