भरदिवसा गोळीबार करून व्यावसायिकास लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 11:48 IST2019-08-12T11:47:45+5:302019-08-12T11:48:16+5:30

तुझ्याकडे जे काही असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत...

Robbed a businessman by firing in the days | भरदिवसा गोळीबार करून व्यावसायिकास लुटले 

भरदिवसा गोळीबार करून व्यावसायिकास लुटले 

ठळक मुद्देभोसरीतील प्रकार : सोनसाखळीसह रोकड लंपास

पिंपरी : भरदिवसा गोळीबार करून दहशत निर्माण केली. तसेच मोबाइल ?क्सेसरी विक्रीचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाची ६० हजारांची सोनसाखळी व त्याच्या स्टॉलच्या पेटीतून दोन हजार ४५० रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ पुणे-नाशिक महामार्गालगत रविवारी (दि. ११) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्या त आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी ऊर्फ सॅण्डी गुप्ता, बाबा पांडे, शिवा खरात, विकास जैसवाल व त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अक्षय अंगत भांडवलकर (वय २१, रा. बाबा लांडगे चाळ, धावडे वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. 
फिर्यादी भांडवलकर यांनी रविवारी भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ मोबाइल अ‍ॅक्सेसरी विक्रीसाठी स्टॉल लावला होता. त्यावेळी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे असलेले आरोपी गुप्ता, पांडे, खरात, जैसवाल व त्यांचा एक साथीदार एका पांढ-या रंगाच्या चारचाकीमधून तेथे आले. तुझ्याकडे जे काही असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत, असे आरोपी म्हणाले. मात्र फियार्दी भांडवलकर यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी सनी गुप्ता याने पिस्तुलाने हवेत गोळीबार केला. तसेच फियार्दी भांडवलकर यांची 20 ग्रॅम सोन्याची 60 हजारांची सोनसाखळी व स्टॉलच्या पेटीतून दोन हजार 450 रुपये जबरदस्तीने चोरून नेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरोपी सनी गुप्ता, शिवा खरात व विकास जैसवाल यांच्यावर 2018 मध्ये दरोडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तर आरोपी बाबा पांडे बेकायदेशिर हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. या चौघांचा तसेच त्यांच्या एका साथीदाराचा भोसरी पोलीस शोध घेत आहेत. 
    भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ पुणे-नाशिक महामार्गालगत रविवारी आठवडे बाजार असतो. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. व्यावसायिक मोठ्या संख्येने येथे स्टॉल लावतात. त्यामुळे येथे बाजाराची वर्दळ असते. फियार्दी भांडवलकर यांनी स्टॉल लावला असता आरोपींनी भरदिवसा गोळीबार करून त्यांला लुटले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Robbed a businessman by firing in the days