Remdesivir Injection : रेमडेसिविरचा काळाबाजार; नातेवाईकांची भटकंती सुरूच, डॉक्टरसह सात जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:47 IST2021-04-17T01:55:36+5:302021-04-17T06:47:30+5:30
Remdesivir Injection: औरंगाबाद व नागपूरमध्ये शुक्रवारी पोलिसांनी काळाबाजार करणारी टोळी पकडली. नागपूरमधून डॉक्टरसह चौघांना अटक केली तर औरंगाबादमध्ये तिघांना अटक केली.

Remdesivir Injection : रेमडेसिविरचा काळाबाजार; नातेवाईकांची भटकंती सुरूच, डॉक्टरसह सात जणांना अटक
नागपूर/औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शनसाठी भटकंती करीत असतानाच त्याचा गैरफायदा घेत या इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच आहे. औरंगाबाद व नागपूरमध्ये शुक्रवारी पोलिसांनी काळाबाजार करणारी टोळी पकडली. नागपूरमधून डॉक्टरसह चौघांना अटक केली तर औरंगाबादमध्ये तिघांना अटक केली.
नागपूर पोलिसांना कामठीमध्ये आशा हॉस्पिटलचे डॉ. लोकेश साहू यांच्याकडे १६ हजार रुपयांत एक रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डमी ग्राहकाच्या माध्यमातून इंजेक्शनची डिलिव्हरी करताना पोलिसांनी डॉ. साहू याला अटक केली. त्याची चौकशी केल्यावर प्रतापनगर येथील स्वस्थम हॉस्पिटलमधील दोन वॉर्डबॉयजवळ रेमडेसिविर असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर त्या वॉर्डबॉयनासुद्धा रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ७ इंजेक्शन जप्त करण्यात आली. त्यांची कसून चौकशी करीत असताना हिंगणा येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये एक वॉर्डबॉय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा खुलासा झाला. पोलिसांनी मेघे हॉस्पिटलच्या त्या वॉर्डबॉयला सुद्धा ताब्यात घेतले.
औरंगाबादेत कर्मचाऱ्यासह तिघांना अटक
औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी रेमडीसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड केली. यामध्ये जिल्हा रुग्णालय (मिनी घाटी) येथील एक कर्मचारी आणि दोन औषधविक्रेते अशा तिघांचा समावेश आहे. या टोळीकडे तीन इंजेक्शन सापडले असून, यामधील दोन इंजेक्शन घाटी रुग्णालयातील आहेत तर एक इंजेक्शन बीड येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले.
आरोपींमध्ये ओमप्रकाश बोहते हा जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि मंदार अनंत भालेराव व अभिजित नामदेव तौर या दोन औषध विक्रेत्यांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी झाल्याचे वृत्त लोकमतने १४ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. या प्रकारानंतर वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणाही जागी झाली.
पाच दहा हजार जास्त घ्या पण, रेमडेसिविर द्या
नाशिक महापालिकेने २० हजार रेमडेसिविर इंजेक्शन मागविल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकल्यानंतर, एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला थेट बडोदा येथून परिचिताने फोन केला आणि दोन इंजेक्शनसाठी गाडी पाठविण्याची तयारी दर्शवली. पाच दहा हजार जास्त घ्या, पण रेमडेसिविर उपलब्ध करून द्या, अशी विनवणी नातेवाईकांकडू्न होत आहे. एक इंजेक्शन घेण्यासाठी मुंबई, पालघर, जळगावमधून खास गाडी नाशिक घेऊन इंजेक्शन नेण्याची तयारी नातेवाईक दर्शवत आहेत.
रुग्णांना इंजेक्शन लावण्यात येत नाही
सुत्रांच्या माहितीनुसार रॅकेटमध्ये डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत. कोरोना वार्डात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. याचा फायदा घेत कर्मचारी रेमडेसिविरची चोरी करतात. ज्या रुग्णाच्या नावावर इंजेक्शन मागविण्यात येते, त्याला लावण्यात येत नाही. इंजेक्शनची काळाबाजारी करून त्याला १० ते २० हजारात विक्री करतात.