नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 08:21 IST2025-12-30T08:21:25+5:302025-12-30T08:21:59+5:30
एका नराधम सावत्र पित्याने आपल्याच १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
उत्तर प्रदेशातील संतकबीरनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम सावत्र पित्याने आपल्याच १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, या नराधमाचे नशीब इतके वाईट होते की, पीडित मुलीची आई स्वतः पोलीस दलात कार्यरत आहे. लेकीसोबत झालेला अन्याय समजताच या रणरागिणीने कोणतीही दयामाया न दाखवता थेट आपल्या पतीविरोधात तक्रार नोंदवून त्याला तुरुंगाची हवा खायला लावली आहे.
एकटेपणाचा फायदा घेऊन अत्याचार
पीडित मुलगी ही एका खासगी शाळेत पाचवीत शिकते. ती आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत खलीलाबाद कोतवाली परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होती. घटनेच्या दिवशी घरात कुणीही नसल्याची संधी साधून नराधम पित्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केला. या घटनेनंतर चिमुरडी प्रचंड मानसिक तणावात होती. मात्र, तिने हिंमत एकवटली आणि कर्तव्यावर असलेल्या आपल्या आईला सर्व हकीकत सांगितली.
आईने कर्तव्य पाळलं; पतीला तुरुंगात धाडलं
लेकीच्या तोंडून हा अघोरी प्रकार ऐकल्यावर आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, त्या ढसाढसा रडत बसल्या नाहीत. स्वतः पोलीस खात्यात असल्याने त्यांनी तातडीने कायद्याचे पाऊल उचलले. त्यांनी खलीलाबाद कोतवाली गाठून आपल्या पतीविरोधात लिखित तक्रार दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर 'पोक्सो'सह बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पोलीस प्रशासनाची कठोर भूमिका
या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी अमित कुमार यांनी सांगितले की, "मुलीचा जबाब आणि वैद्यकीय तपासणी अहवालाच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकरणांत कोणतीही हयगय केली जाणार नाही. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस भक्कम पुरावे गोळा करत आहेत."