रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 10:02 IST2025-03-03T10:01:01+5:302025-03-03T10:02:39+5:30
हरयाणा येथील रोहतकमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत.

रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा
हरयाणा येथील काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांची हत्या झाली. त्यांचा मृतदेह सुटकेसमधून फेकून देण्यात आला. काल सोमवारी या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीचे नाव सचिन असं आहे. आरोपी बहादुरगड येथील राहणार आहे. हिमानी यांची हत्या त्याने त्याच्याच घरात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिमानी यांचा मृतदेह ज्या सुटकेसमध्ये सापडला ती सुटकेस हिमानी यांच्या घरातील होती. हत्या करणारा तरुण हा हिमानी यांचा ओळखीचा आहे. आरोपीकडून हिमानी यांचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. सीआयए २ च्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमानी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होतो आणि ती ब्लॅकमेल करत होती. शिवाय, लाखो रुपयेही उकळण्यात आले होते, असा दावा त्या आरोपीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तपासानंतरच हत्येमागील खरे कारण समोर येईल. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, "आम्ही आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेणार आहोत. पत्रकार परिषदेदरम्यान आम्ही माहिती शेअर करू."
भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या
काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येनंतर मृतदेह सूटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आला होता. हिमानी यांच्या आईने हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचा आरोप केला होता. हिमानी नरवाल गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत होत्या. त्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्येही सहभागी झाल्या होत्या. भारत जोडो यात्रेदरम्यान, हिमानी यांचा राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला आहे.
दरम्यान हिमानी नरवाल यांच्या भावाने प्रतिक्रिया दिली आहे. भाऊ जतिन म्हणाला, "एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि आज आम्ही तिचे अंत्यसंस्कार करणार आहे. माध्यमांमध्ये खूप अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला न्याय मिळेल. आम्हाला अजूनही आरोपी कोण आहे हे माहित नाही, पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही. आम्हाला आरोपीला फाशीची शिक्षा हवी आहे, अशी मागणी त्यांनी केली.