"रस्त्याचा बेस २ इंच करा, पण माझे ८% कमिशन द्या"; नगरपालिकेच्या कामात पैसे मागितल्याचा ऑडिओ व्हायरल; भाजपच्या अडचणी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:24 IST2025-11-24T18:11:26+5:302025-11-24T18:24:38+5:30
मध्य प्रदेशातील एका नगरपालिकेत उपाध्यक्षाने कमिशन मागितल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"रस्त्याचा बेस २ इंच करा, पण माझे ८% कमिशन द्या"; नगरपालिकेच्या कामात पैसे मागितल्याचा ऑडिओ व्हायरल; भाजपच्या अडचणी वाढल्या
MP Viral Audio Clip: मध्यप्रदेशातील विदिशा नगरपालिकेमध्ये एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. नगरपालिकेचे प्रभारी अध्यक्ष आणि एका ठेकेदारामधील कथित संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. या ऑडिओने केवळ स्थानिक राजकारणात भूकंप घडवला नाही, तर नगरपालिकेतील कथित कमिशनखोरी उघडकीस आणली आहे. या व्हायरल ऑडिओमध्ये कथितरित्या नगरपालिकेचे उपाध्यक्ष संजय दिवाकीर्ति आणि ठेकेदार राजेश शर्मा (मिंटू) यांच्यात संवाद झाल्याचे ऐकायला मिळत आहे.
ऑडिओमध्ये नेमके काय आहे?
व्हायरल झालेल्या ऑडिओनुसार, प्रभारी अध्यक्ष हे ठेकेदाराला थेट काम निकृष्ट दर्जाचे करण्याची सूचना देत असून त्या बदल्यात स्वतःचे कमिशन मागत असल्याचे ऐकू येते. "रस्त्याचा बेस ४ इंचीच्या जागी २ इंचीचा टाकून द्या, पण माझे ८ टक्के कमिशन नक्की झाल्याचे सांगून टाका," असं संजय दिवाकीर्ति म्हणत आहेत. या कथित संभाषणातून स्पष्ट झाले की, सार्वजनिक रस्त्याच्या गुणवत्तेपेक्षा आणि नागरिकांच्या हितापेक्षा कमिशनला अधिक महत्त्व दिले जात आहे.
भाजपच्या अडचणीत वाढ, विरोधकांचे आरोप खरे ठरले
हा ऑडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा अनेक नगरसेवक विकासकामे न झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धरणे आंदोलन करत आहेत. या नगरसेवकांनी यापूर्वीही नगरपालिकेच्या अध्यक्षांवर उघडपणे कमिशनखोरीचे गंभीर आरोप केले होते. आता हा व्हायरल ऑडिओ त्यांच्या आरोपांना अधिक बळ देत आहे.
या प्रकरणामुळे विदिशातील भाजप संघटनेतही मोठी खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या अध्यक्षा प्रीती शर्मा यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपाध्यक्षांना प्रभारी अध्यक्षपद दिले होते आणि याच काळात हा कथित घोटाळा उघडकीस आला आहे. स्थानिक आमदार मुकेश टंडन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना "विदिशामध्ये आज ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे, त्यात सामान्य नागरिक नव्हे, तर जबाबदार नागरिकच गुंतलेले आहेत," असं म्हटलं.
पोलिसांकडून चौकशी सुरू
दुसरीकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत चौबे यांनी माहिती दिली की, ठेकेदार राजेश शर्मा यांच्याकडून पोलिसांना एक अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जात त्यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओचे चुकीचे प्रक्षेपण केले जात असल्याचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून, त्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल.