लाल चंदनाची 'पुष्पा' स्टाईल तस्करी; तिघांना अटक, कोट्यवधीचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:53 IST2025-01-23T17:53:27+5:302025-01-23T17:53:47+5:30
Red Sanders Smuggling: पुष्पा चित्रपटाप्रमाणे एका कंटेनरमध्ये लाल चंदन लपवून ठेवले होते.

लाल चंदनाची 'पुष्पा' स्टाईल तस्करी; तिघांना अटक, कोट्यवधीचा माल जप्त
Red Sanders Smuggling: तुमच्यापैकी अनेकांनी 'पुष्पा' चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात तिरुपतीच्या जंगलातून लाल चंदनाची तस्करी केल्याचे दाखवण्यात आले आहे. दरम्यान, आता पोलिसांनी अशाच एका घटनेचा पर्दाफाश केला आहे. तिरुपती रेड सँडर्स अँटी स्मगलिंग टास्क फोर्सने आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात मोठ्या आंतरराज्यीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 22 जानेवारी रोजी 4.5 कोटी रुपयांचे लाल चंदन जप्त केले आणि तीन तस्करांनाही अटक केले. नरेंद्र कुमार उर्फ मणी (तामिळनाडू), बिनॉय कुमार भगत (आसाम) आणि विजय जोशी (राजस्थान) अशी तस्करांची नावे आहेत. या तिघांना अटक करून त्यांची चौकशी केली जात असून, त्यामध्ये या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि त्यांच्या नेटवर्कचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
पुष्पा स्टाईल तस्करी
लाल चंदनाची तस्करी करण्याची पद्धत पुष्पा या चित्रपटासारखीच होती. तस्करांनी चित्रपटाप्रमाणे लालचंदन एका कंटेनर लॉरीमध्ये लपवून ठेवले होते. 7 टन लाल चंदन आसाममध्ये नेले जात होते, पण त्यापूर्वीच पोलिसांनी तस्करांना पकडले.
लाल चंदनाची वैशिष्ट्ये
लाल चंदन आंध्र प्रदेशातील लुप्तप्राय लाकडाची प्रजाती आहे. त्याच्या अनोख्या लाल रंगामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशेषत: चीन आणि जपानमध्ये प्रचंड मागणी आहे. हे मुख्यतः फर्निचर, वाद्ये आणि सजावटीच्या वस्तूंसाठी वापरले जाते, ज्यामुळे त्याचे मूल्य आणखी वाढते. लाल चंदनाला जास्त मागणी असल्याने काळ्या बाजारात मोठा नफा कमावला जातो. त्यामुळे या लाकडाची तस्करी केली जाते.