बलात्कार पीडिता विवस्त्र चालत गेली, लोक व्हिडीओ काढत राहिले; UPमधील संतापजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 14:07 IST2022-09-23T14:07:22+5:302022-09-23T14:07:40+5:30
आरोपीचे कुटुंबीय पीडितेला जिवे मारण्याची धमकी देत आहेत, असा आरोपही पीडितेने केलेला आहे.

बलात्कार पीडिता विवस्त्र चालत गेली, लोक व्हिडीओ काढत राहिले; UPमधील संतापजनक प्रकार
मुरादाबाद: सामूहिक बलात्कारातील पीडिता विवस्त्रावस्थेत दोन किलोमीटर चालून घरी पोहोचल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुरादाबाद-ठाकूरद्वारा रोडवरील या प्रकारात काहीजण तिला मदत करण्याऐवजी व्हिडीओ करताना दिसत आहेत. पाचजणांनी तिचे अपहरण केले होते व सामूहिक बलात्कार केला होता, असा आरोप आहे.
पीडितेच्या नातेवाइकांनी सांगितले की, ती घरी परतली तेव्हा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. तिने रडत रडत आपबिती सांगितली. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच कारवाई केली नाही. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे कुटुंबीय पीडितेला जिवे मारण्याची धमकी देत आहेत, असा आरोपही तिने केलेला आहे.
पोलीस म्हणतात...
संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजत असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, विवस्त्रावस्थेत फिरणाऱ्या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, बलात्कार झालेला नाही, असे समोर आले आहे.
जत्रेतून केले अपहरण-
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती जवळच्या गावात जत्रेत गेली होती, तेव्हा पाचजणांनी तिचे अपहरण केले व बलात्कार केला. तिने आरडाओरडा केल्यावर एक गावकरी घटनास्थळी पोहोचला. परंतु, तोपर्यंत पाचही आरोपी तिचे कपडे घेऊन फरार झाले होते. या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.