लग्नास नकार देणाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार; बार व्यवस्थापकावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 21:53 IST2021-06-15T21:52:38+5:302021-06-15T21:53:02+5:30
Rape complaint against a person who refuses to marry : बेलतरोडी पोलिसांनी या प्रकरणी एका बार व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.

लग्नास नकार देणाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार; बार व्यवस्थापकावर आरोप
नागपूर - लग्न करण्याची थाप मारून सहा महिन्यांपासून इकडे तिकडे फिरविणाऱ्या तरुणाने आता लग्नास स्पष्ट नकार दिल्यामुळे तरुणीने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. बेलतरोडी पोलिसांनी या प्रकरणी एका बार व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.
जयदीप किशोर भगत (वय ३०) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो वर्धा मार्गावरील गावंडे ले-आऊटमध्ये राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, नातेवाईकांचा बीअर बार चालविणारा भगत डिसेंबर २०२० मध्ये तक्रार करणाऱ्या तरुणीला बघण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी मध्यस्थांमार्फत त्याची ओळख झाली. एकमेकांना पसंत करण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांच्यातील घसट वाढली. तरुणीच्या तक्रारीनुसार, २१ डिसेंबर २०२० पासून तो तिला इकडे तिकडे फिरायला नेऊ लागला.
मनीषनगरातील एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. बाहेरगावीही अनेक ठिकाणी हा प्रकार झाला. आता त्याचे मन भरले की काय, कळायला मार्ग नाही. भगतने लग्नास नकार दिला आहे. मध्यस्थांकडे हा प्रकार गेल्यानंतर त्यांनीही त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याची नकारघंटा कायम आहे. त्यामुळे तरुणीने बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेऊन भगतविरुद्ध बलात्काराचा आरोप लावणारी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.