Ranya Rao : ५२ ट्रिपपैकी २६ वेळा कोणासोबत दुबईला गेली रान्या राव?; सोनं तस्करी प्रकरणात नवी एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:11 IST2025-03-19T11:11:09+5:302025-03-19T11:11:45+5:30

Ranya Rao : रान्या राव हिच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे.

Ranya Rao went to dubai with friend tarun raju 26 times out of 52 trips new revelation in gold smuggling case | Ranya Rao : ५२ ट्रिपपैकी २६ वेळा कोणासोबत दुबईला गेली रान्या राव?; सोनं तस्करी प्रकरणात नवी एन्ट्री

Ranya Rao : ५२ ट्रिपपैकी २६ वेळा कोणासोबत दुबईला गेली रान्या राव?; सोनं तस्करी प्रकरणात नवी एन्ट्री

कन्नड अभिनेत्री आणि डीजीपी दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी रान्या राव हिच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना असं आढळून आलं आहे की, या प्रकरणातील दुसरा आरोपी तरुण राजू ह अभिनेत्री रान्या रावचा जवळचा मित्र आहे, त्याने दुबईहून हैदराबादला २६ वेळा प्रवास केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रान्याने तरुणच्या खात्यात ट्रान्सफर केलेल्या पैशांचा वापर करून तिकिटाचे पैसे देण्यात आले. या व्यवहाराचे कागदोपत्री पुरावे त्यांच्याकडे असल्याचा दावा तपासकर्त्यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण राजूने दुबईमध्ये रान्या रावला सोनं दिलं होतं, ज्यामुळे तस्करीच्या कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला. रान्याने २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत एकूण ५२ वेळा दुबईला प्रवास केला आहे. यापैकी २६ वेळा रान्या राव आणि तरुण राजू हे एकत्र राहिले होते. रान्या अनेकदा त्याच दिवशी सोनं घेऊन परत येत असे.

८ मार्च रोजी तरुणने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलं. मात्र यात तो अपयशी ठरला. यानंतर तो हैदराबादहून बंगळुरूला गेला, जिथे त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर, अधिकाऱ्यांनी तरुणच्या बहिणीला घटनेची माहिती दिली जेणेकरून सर्वकाही कायदेशीर प्रक्रियेनुसार होत आहे याची खात्री होईल.

तपासकर्त्यांना असेही आढळून आलं की, तरुणकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे, ज्यामुळे तस्करीमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय आणखी वाढतो. तो जिनेव्हाला जात होता या त्याच्या दाव्यावर अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, ते म्हणाले की, तो प्रथम हैदराबाद आणि नंतर बंगळुरूला गेला होता. त्यांचा असा युक्तिवाद आहे की जर जिनेव्हा हे त्याचं अपेक्षित ठिकाण असेल, तर इकडे वळण्याचं कोणतंही कारण नव्हतं, ज्यामुळे तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय निर्माण होतो.

चौकशीदरम्यान, तरुणने अधिकाऱ्यांना सांगितलं की, त्याने आणि अभिनेत्री रान्या राव यांनी दुबईमध्ये सोनं आयात आणि निर्यात करण्यासाठी व्हिएरा डायमंड्स ट्रेडिंग नावाची कंपनी उघडली होती. सध्या डीआरआयचे अधिकारी त्या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करत आहेत. रान्या रावला ३ मार्च रोजी बंगळुरू विमानतळावर १४ किलो सोन्यासह अटक करण्यात आली.

Web Title: Ranya Rao went to dubai with friend tarun raju 26 times out of 52 trips new revelation in gold smuggling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.