उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:52 IST2025-12-11T16:50:45+5:302025-12-11T16:52:08+5:30
जंगलात २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

फोटो - आजतक
झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंडकेच्या जंगलात २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महावीर सिंह चुडावत असं तरुणाचं नाव असून त्याचं लग्न ११ डिसेंबर रोजी होणार होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात पडलेल्या मृतदेहाजवळ उंदीर मारण्याचं औषध, सल्फासची गोळी आणि तरुणाचा तुटलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. हे साहित्य मिळाल्यामुळे पोलीस हत्या की आत्महत्या, या दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.
तरुणाचा मृतदेह राजस्थानपासून शेकडो किलोमीटर दूर झारखंडच्या जंगलात आढळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, महावीर त्याच्या तीन दिवसांवर आलेल्या लग्नामुळे तणावात होता की, कौटुंबिक वादामुळे तो त्रस्त होता. त्यामुळे अनेक गोष्टींची पडताळणी केली जात आहे. सध्या कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं घाईचं ठरेल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट तसेच नातेवाईकांच्या जबाबामुळेच सर्व बाबी स्पष्ट होतील असं पोलिसांचं म्हणणं आहे.
या रहस्यमय मृत्यूची माहिती मिळताच रामगढ पोलिसांनी तरुणाच्या कुटुंबाशी फोनवरून संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. कुटुंबातील सदस्य राजस्थानहून रामगढकडे निघाले आहेत. कुटुंबीय आल्यानंतर महावीरची मानसिक स्थिती, अलीकडील दिवसांतील त्याचं वागणं आणि कोणत्याही संभाव्य वादाबद्दल अधिक माहिती मिळू शकेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
रामगढचे एसपी अजय कुमार यांनी सांगितलं की, आठ तारखेला गंडकेच्या जंगलात २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळाला आहे. मृतदेहाजवळ उंदीर मारण्याचं औषध, सल्फासची गोळी आणि तुटलेला मोबाईल मिळाला. प्राथमिक माहितीनुसार, हा तरुण लग्नाच्या तणावामुळे किंवा कौटुंबिक मतभेदांमुळे त्रस्त होता, असं वाटतं. पण आम्ही सर्व बाजूंनी कसून तपास करत आहोत.