'दृश्यम' चित्रपटातून घेतली आयडिया; पत्नीच्या प्रियकराला मारुन घरात पुरले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:43 IST2022-11-28T17:43:02+5:302022-11-28T17:43:46+5:30
देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वॉकर मर्डर प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला यानेही घटनेपूर्वी 'दृश्यम' सिनेमा पाहिला होता.

'दृश्यम' चित्रपटातून घेतली आयडिया; पत्नीच्या प्रियकराला मारुन घरात पुरले, पण...
राजकोट: देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वॉकर मर्डर प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला (28) याने घटनेपूर्वी 'दृश्यम' सिनेमा पाहिला होता. आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीदरम्यान ही बाब समोर आली. दरम्यान, तिकडे गुजरातमधील राजकोटमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. दृश्यम या चित्रपटासारखीच एक घटना समोर आली आहे.
चित्रपटाची आयडिया घेऊन राजकोटमध्ये एका तरुणाची हत्या करून मृतदेह पुरण्यात आला. गौतम गोहेल हा तरुण गुजरातमधील तरघडी येथे राहत होता. गौतमचे त्याच्याच गावातील एका गुराख्याच्या बायकोसोबत प्रेम संबंध होते. 2020मध्ये दोघे पळून गेले, मात्र नंतर घरी परतले. याबाबत मेंढपाळाला माहिती मिळताच त्याने गौतमच्या हत्येचा कट रचला.
मेंढपाळाने साथीदारांच्या मदतीने गौतमला भेटायला बोलावले आणि डोक्यात पाईप मारुन त्याची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, मृतदेह त्यांच्याच अंगणात पुरला. पण, कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 14 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे गूढ उकलले. या तरुणाला फोन करणाऱ्या तरुणीला आणि मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपींनी पोलिसांना मृतदेह पुरलेल्या ठिकाणी नेले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मृत तरुणाचे वडील जयंतीभाई घेलाभाई गोहेल यांनी शैलेश उर्फ कालो लक्ष्मण जपडा, त्याचा भाऊ सागर लक्ष्मण जपडा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली. पडझरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत त्यांचा मुलगा 14 नोव्हेंबरपासून गूढ परिस्थितीत बेपत्ता झाल्याचे म्हटले होते. तक्रारीनंतर पोलिसांनी कॉल डिटेल्सवरून तपास सुरू केला अन् हत्येचा खुलासा केला.