हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:23 IST2026-04-03T12:23:10+5:302026-04-03T12:23:35+5:30
गुजरातमध्ये राजकोटच्या मोरबी हायवेवर असलेल्या हडाला गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
गुजरातमध्ये राजकोटच्या मोरबी हायवेवर असलेल्या हडाला गावाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडोदराहून ५ दिवसांपूर्वी रोजगाराच्या शोधात राजकोटला आलेल्या ३९ वर्षीय नेपाळी शेफने आर्थिक चणचण आणि काम न मिळाल्याने आलेल्या मानसिक तणावातून ट्रकखाली उडी मारून आत्महत्या केली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून कुवाडवा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
राजकोटजवळील हडाला गावात असलेल्या 'विराट हॉटेल'मध्ये मुक्कासाला असलेले जगदीश रामदूतप्रसाद जोशी दुपारी १२:३० च्या सुमारास पायी चालत जात होते. त्याच वेळी समोरून वेगाने येणाऱ्या एका अज्ञात ट्रकखाली त्यांनी अचानक उडी मारून स्वतःला संपवलं. या भीषण अपघातात जगदीश यांचे दोन्ही पाय कापले गेले आणि ते गंभीररित्या जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जगदीश यांचे मित्र प्रकाश यांच्याशी 'आजतक'च्या प्रतिनिधीने फोनवर संवाद साधला असता धक्कादायक माहिती समोर आली. प्रकाश यांनी सांगितलं की, "आम्ही दोघेही वडोदराहून राजकोटला कामाच्या शोधात आलो होतो. जगदीश हा एक शेफ होता, जो वडोदऱ्यातील विविध केटरिंग सर्व्हिसेसमध्ये काम करायचा. मात्र, लग्नसराईचा सीझन संपल्यानंतर त्याला काम मिळणं बंद झालं होतं, त्यामुळे तो राजकोटला आला होता."
राजकोटमध्येही त्याने पाच दिवस वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये कामासाठी प्रयत्न केले, पण गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद होती. त्यामुळे त्याला कुठेच नोकरी मिळू शकली नाही. मंदी आणि बेरोजगारीमुळे त्रस्त झालेल्या जगदीशची मानसिक स्थिती खालावली होती. रस्ता ओलांडताना अचानक त्याने ट्रकसमोर उडी घेतली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
जगदीश यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. जगदीश यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. सध्या पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.