पंजाबपोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेल (SSO)ने बुधवारी एका पाकिस्तानी हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश केला आणि जसबीर सिंग नावाच्या एका युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंगला पाकिस्तान समर्थित हेरगिरी नेटवर्कमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. जसबीरचे युट्यूबवर ११ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपनगर येथील रहिवासी जसबीर सिंगवर पाकिस्तानी गुप्तहेर एजंट शाकीर उर्फ जट्ट रंधावाशी संबंध असल्याचा आरोप आहे, जो हेरगिरी नेटवर्कचा भाग आहे. जसबीरचे हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी नागरिक एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्याशी जवळचे संबंध होते.
पंजाब पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, जसबीर सिंग दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीत आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी झाला होता, जिथे तो पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगर्सना भेटला. जसबीरन २०२०, २०२१ आणि २०२४ मध्ये तीन वेळा पाकिस्तानला गेला होता. त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक पाकिस्तानी फोन नंबर सापडले आहेत, ज्यांची आता फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.
ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर जसबीरने या पीआयओंशी केलेल्या त्याच्या सर्व संवादातील कंटेन्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो समोर येऊ नये अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहालीच्या एसएसओसीने या प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गगनदीप सिंगला देखील अटक करण्यात आली आहे.