७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:00 IST2025-10-18T10:59:26+5:302025-10-18T11:00:37+5:30
सीबीआयने रोपर रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहाथ अटक केली.

७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
पंजाब पोलिसांच्या एका डीआयजीच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छाप्याने सर्वांनाच धक्का बसला. सीबीआयने रोपर रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहाथ अटक केली. झडतीदरम्यान ७.५ कोटी रोख, अंदाजे २.५ किलो सोन्याचे दागिने, रोलेक्स आणि राडो ब्रँडेड २६ लक्झरी घड्याळं, चार शस्त्र, १७ काडतुसं, १०८ परदेशी दारूच्या बाटल्या, मर्सिडीज आणि ऑडी कारच्या चाव्या, बँक अकाऊंट्स डॉक्युमेंट्स आणि ५० मालमत्तेची कागदपत्रं जप्त करण्यात आली.
सीबीआयने डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर मोहाली येथील त्यांच्या कार्यालयात एका भंगार व्यापाऱ्याकडून ८ लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना कारवाई केली. व्यापाऱ्याने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे की, डीआयजी त्याच्याविरुद्धचा जुना खटला निकाली काढण्याचे आश्वासन देत होते आणि त्यासाठी दरमहा लाखो रुपये मागायचे.
फतेहगढ साहिब जिल्ह्यातील मंडी गोविंदगड येथील भंगार व्यापारी आकाश बट्टा याने सीबीआयला सांगितलं की, नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी एका मध्यस्थामार्फत पैशांची मागणी करण्यात आली होती. तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी सीबीआयने सापळा रचला. तपासादरम्यान, डीआयजी आणि त्यांच्या मध्यस्थांमधील व्हॉट्सएप कॉलची पुष्टी झाली, ज्यामध्ये लाचेची रक्कम मागितली जात होती.
१० दिवसांच्या देखरेखीनंतर, सीबीआयने गुरुवारी सापळा रचला आणि डीआयजीला रंगेहाथ पकडलं. ८ लाख रुपयांच्या लाचेपैकी ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. सीबीआयने शुक्रवारी त्याला चंदीगडमधील विशेष न्यायालयात हजर केलं, जिथे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. सीबीआय रिमांडची मागणी करण्यात आली नाही.
सीबीआयच्या प्राथमिक अहवालानुसार, भुल्लर यांच्या घरातील आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या सुमारे ५० स्थावर मालमत्तेची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. यापैकी अनेक मालमत्ता चंदीगड, मोहाली, पटियाला आणि लुधियाना येथे आहेत. तपास यंत्रणेचं म्हणणं आहे की, ही फक्त सुरुवात आहे. डीआयजीचं नेटवर्क आणि त्यांच्या बेकायदेशीर मालमत्ता देशभरातील विविध राज्यांमध्ये आहेत. हरचरण सिंग भुल्लर हे २००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जानेवारी २०२३ मध्ये त्यांना डीआयजी पदावर बढती देण्यात आली.