भरलग्नात आपच्या सरपंचाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; सुरक्षा हटताच इशारा दिला अन्....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 09:47 IST2026-01-05T09:24:52+5:302026-01-05T09:47:49+5:30
पंजाबमध्ये आपच्या सरपंचाची लग्नात घुसून गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली.

भरलग्नात आपच्या सरपंचाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; सुरक्षा हटताच इशारा दिला अन्....
Punjab Crime: पंजाबच्या अमृतसरमध्ये एका विवाह सोहळ्यामध्ये सरपंचाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि तरनतारन जिल्ह्यातील वल्तोहा गावचे सरपंच झरमल सिंह यांची दोन अज्ञात हल्लेखोरांनी अतिशय निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.
अमृतसरमधील 'द मॅरीगोल्ड रिसॉर्ट'मध्ये मुलीकडील नातेवाईकाच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता. सरपंच झरमल सिंह देखील या लग्नासाठी खास उपस्थित होते. सर्व पाहुणे जेवणाचा आस्वाद घेत असताना, झरमल सिंह एका टेबलवर बसून जेवत होते. त्याच वेळी दोन तरुण बेधडकपणे रिसॉर्टमध्ये शिरले आणि त्यांनी सरपंचांच्या मागील बाजून येऊन त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडल्या. गोळी थेट माथ्यात लागल्याने झरमल सिंह जागीच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हल्लेखोरांची प्रोफेशनल पद्धत
या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यातून हल्लेखोरांच्या नियोजित कट समोर आला आहे. काळ्या हुडी घातलेल्या एका हल्लेखोराच्या कानाला मोबाईल लागलेला होता. पोलीस संशय व्यक्त करत आहेत की, रिसॉर्टच्या आत असलेला कोणीतरी व्यक्ती हल्लेखोरांना सरपंचांच्या प्रत्येक हालचालीची माहिती फोनवरून देत होता. हल्लेखोरांनी आपले चेहरे झाकले नव्हते. लोकांमध्ये दहशत बसावी आणि आपला चेहरा ओळखला जावा, या उद्देशाने त्यांनी ही हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटनेच्या काही वेळ आधीच आपचे आमदार सरवन सिंह धुन यांनी सरपंचांची भेट घेतली होती. आमदाराच्या निघाण्यानंतर आणि सरपंचांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक बाजूला झाल्याची खात्री पटताच हल्लेखोरांनी हल्ला केला.
बंबीहा गँगचे सोशल मीडिया चॅलेंज
या हत्येनंतर पंजाबच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे, कारण कुख्यात बंबीहा गँगने सोशल मीडिया पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या गँगने दावा केला आहे की त्यांनीच ही हत्या घडवून आणली. झरमल सिंह यांना यापूर्वी काही निनावी क्रमांकांवरून धमक्या येत होत्या, ज्याचा तपास आता पोलीस करत आहेत.
हल्लेखोरांची ओळख पटली असून ते स्थानिक नसून बाहेरून आलेले शूटर असावेत असं पोलिसांनी सांगितले. पोलीस सध्या टेक्निकल सर्व्हिलन्स आणि रिसॉर्टमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ज्या क्रमांकांवरून सरपंचांना धमक्या आल्या होत्या, त्याचा तपास करण्यासाठी अमृतसर पोलीस तरनतारन पोलिसांच्या संपर्कात आहेत.