मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:29 IST2025-12-17T17:27:49+5:302025-12-17T17:29:08+5:30
Punjab Police Encounter: काही दिवसांपूर्वी सोहाना गावात कबड्डी स्पर्धेदरम्यान 30 वर्षीय राणा बलाचौरिया यांची सर्वांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
Mohali Encounter: पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील सोहाना गावात कबड्डी स्पर्धेदरम्यान 30 वर्षीय कबड्डी खेळाडू आणि प्रमोटर कंवर दिग्विजय उर्फ राणा बलाचौरिया यांची सर्वांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या थरारक हत्याकांडप्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या कुख्यात गुंडाचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला आहे.
लालडू येथे चकमक, आरोपी ठार
या हत्येनंतर मोहाली पोलीस आणि अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने शोधमोहीम तीव्र केली होती. याच दरम्यान लालडू हायवेजवळील एका निर्जण ठिकाणी पोलीस आणि आरोपी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत हरपिंदर सिंह उर्फ मिड्डू (उर्फ हरजिंदर) (रा. नौशेहरा पन्नुआं, जिल्हा तरनतारन) याचा मृत्यू झाला. चकमकीदरम्यान दोन पोलीस जवानही गोळी लागून जखमी झाले आहेत.
हत्याकांडात सामील, पण शूटर नव्हता
मोहालीचे एसएसपी हरमनदीप सिंग हंस यांनी चकमकीची अधिकृत पुष्टी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, हरपिंदर सिंह हा कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येच्या कटात सामील होता, मात्र तो थेट गोळी झाडणारा शूटर नव्हता. तो ग्राउंड लेव्हलवर माहिती देणारा आणि मदत करणारा मुख्य हँडलर होता. ही हत्या 15 डिसेंबर रोजी झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत ऐशदीप सिंग आणि जुगराज सिंग, या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एसएसपी हंस यांनी सांगितले की, ऐशदीप सिंग हा कुख्यात गँगस्टर डोनी बालचा हँडलर आणि को-ऑर्डिनेटर असून, याचने या हत्येचा कट रचला होता. तोच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
रशियातून भारतात, नंतर पळून जाण्याचा प्रयत्न
पोलिस तपासानुसार, ऐशदीप सिंग 25 नोव्हेंबर रोजी रशियातून भारतात आला होता. तो याआधीही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असून, परदेशात पळून गेला होता. 14 डिसेंबरला त्याने प्रवासाचे तिकीट बुक केले आणि 15 डिसेंबरला हत्या झाल्यानंतर दिल्लीकडे निघाला. याची माहिती मिळताच, 16 डिसेंबर रोजी पोलिसांनी त्याला दिल्ली विमानतळावर अटक केली. अटकवेळी तो मस्कतला पळून जाण्याच्या तयारीत होता.