पुणे - स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे पोलिसांच्या तावडीत सापडला. सध्या त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. आता या तपासात नवा खुलासा समोर आला आहे. आरोपीने फरार असताना तीन वेळा स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न केला होता. स्वारगेट प्रकरणी गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. पुणे शहरापासून लांब शिरूर तालुक्यातील गुनाट गावात त्याच्या घराजवळील ऊसाच्या शेतात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं चौकशीत समोर आले आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिसांच्या तावडीतून वाचवण्यासाठी फरार झाला होता. या काळात त्याने गळफास घेत आत्महत्येचा ३ वेळा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी फास घ्यायच्या वेळी वापरण्यात येणारी रस्सी तुटायची. जेव्हा पोलिसांच्या पथकाने आरोपी गाडेला पकडले तेव्हा त्याच्या गळ्याभोवती फासाच्या खूणा आढळल्या. या खूणांबाबत पोलिसांनी त्याला विचारले तेव्हा ज्याठिकाणी आरोपी लपला होता, तिथे असणाऱ्या एका झाडाला लटकून गळफास घेण्याचा प्रयत्न आरोपीचा होता असं त्याने चौकशीत सांगितले. TOI ने याबाबत वृत्त दिले आहे.
सध्या स्वारगेट पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर होते, तिथे प्रकरणाच्या चौकशीसाठी १४ दिवसांची कोठडी मागण्यात आली. कोर्टाने १२ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे वकील वाजिद खान बिडकर आणि अजिंक्य महाडिक यांनी आरोपीच्य पोलीस कोठडीला विरोध केला. हा बलात्कार नाही, दोघांच्या संमतीने संबंध झाले होते असा दावा आरोपीच्या वकिलाने कोर्टात केला. आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलीस रेकॉर्डनुसार त्याच्यावर आधीच ६ गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, दरोडा, फोन हिसकावण्याचा प्रयत्न यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर सरकारी बसमध्ये पहाटे ५.३० च्या सुमारास एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना स्वारगेट येथील बस स्थानकात घडली. शिवशाही बस ही रात्रभर स्वारगेट बस स्थानकात होती तर पीडित युवती एका हॉस्पिटलमध्ये महिला आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. पीडितेने याबाबत सकाळी ९.३० च्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.