महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 21:22 IST2025-12-14T21:19:38+5:302025-12-14T21:22:08+5:30
Pune Crime: कोयत्याने वार करून केला खून, जेजुरीच्या माळशिरसमधील घटना

महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
जेजुरी: पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे एका महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याचा कोयत्याने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली. आरोपीच्या प्रेयसीशी लग्न केल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेत दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर) याचा खून झाला आहे. तर आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस ता. पुरंदर / मूळ रा. राहू ता. दौड जि. पुणे) हा खून करून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोन, व्हॉट्सअपवर धमक्या
या खुनाबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील मयत दीपक जगताप याचा नुकताच वाघापूर ता. पुरंदर येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मयत दीपक जगताप हा उरुळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करत होता. नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरुळी कांचन येथे राहण्यास गेला. महिनाभर संसार सुरळीत चालू असताना, पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हॉट्सअप कॉल करून, मी पायलशी लग्न करणार होतो, तुम्ही दोघांनी लग्न का केले? असा राग मनात धरून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. याबाबत मयत दीपक ने आपल्या घरातही माहिती दिली होती.
वाद मिटवण्यासाठी भेटला आणि 'खेळ खल्लास' करून टाकला...
शनिवारी, १३ डिसेंबरला, दीपक पायलसह राजेवाडी येथे आला. पायलला घरी सोडून घरी परतत असताना त्याला सुशांत मापारी सतत कॉल करत होता. 'पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा आणि लग्नाचा वाद मिटवून टाक', असे सांगत राहिला. याच बहाण्याने सुशांत दीपकला भेटला. माळशिरस हद्दीतील रामकाठी शिवारात त्याने दीपकला बोलावून घेतले. याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात, मानेवर, पायावर धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर तो कोयता जागेवरच टाकून पसार झाला.
नातेवाईकांनी शोध घेतल्यावर प्रकरण उघडकीस
दीपक जगताप घरी न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी आढळून आल्या. याबाबतची फिर्याद मयत दीपकचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळी सासवड उपविभागिय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौड आणि बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पोलिसांनी पथके तयार करून पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील पुढील तपास करीत आहेत.