टिळा लावला म्हणून पुजाऱ्याची दिव्यांगाला मारहाण, मंदिरात घडली धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 19:09 IST2021-12-08T19:08:31+5:302021-12-08T19:09:04+5:30
Crime News : पिंकू रामेश्वर पांडे (४५) रा. केळापूर असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. पिंकू पांडे हा केळापूर येथील जगदंबा मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. त्याच ठिकाणी जन्मत: दिव्यांग असलेला प्रकाश विजयराव करकुले हा सुद्धा उपस्थित असतो.

टिळा लावला म्हणून पुजाऱ्याची दिव्यांगाला मारहाण, मंदिरात घडली धक्कादायक प्रकार
पांढरकवडा : येथील जगदंबा मंदिरात दर्शनाला आलेल्या मुलांना कुंकवाचा टिळा का लावला ते माझे काम आहे असे म्हणत चवताळलेल्या पुजाऱ्याने चक्क जन्मत:च दिव्यांग असलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी दुपारी घडली.
पिंकू रामेश्वर पांडे (४५) रा. केळापूर असे आरोपी पुजाऱ्याचे नाव आहे. पिंकू पांडे हा केळापूर येथील जगदंबा मंदिरात पुजारी म्हणून काम करतो. त्याच ठिकाणी जन्मत: दिव्यांग असलेला प्रकाश विजयराव करकुले हा सुद्धा उपस्थित असतो. रविवारी दुपारच्या सुमारास दोन मुले जगदंबा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आले. केळापूरची जगदंबा अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते. दर्शनाला आलेल्या दोन मुलांना प्रकाशने कुंकवाचा टिळा लावला. हे पाहून पुजारी पिंकू पांडे चिडला.
कुंकवाचा टिळा लावणे माझे काम आहे, तु टिळा का लावला असे म्हणत प्रकाशला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. पिंकू पांडे यावरच थांबला नाही, तर त्याने दिव्यांग व असाहय्य असलेल्या प्रकाशवर काठीने हल्ला चढविला. त्याला काठीने बेदम मारहाण केली उपस्थितांनी प्रकाशची कशीबशी सुटका केली. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी कलम ३२४, २९४, ५०४ भादंवि, सहकलम ९२ (अ) (ब) दिव्यांग व्यक्तीचे अधिकार या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास ठाणेदाराच्या मार्गदर्शनात सुरू आहे.