प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:15 IST2025-05-13T12:13:12+5:302025-05-13T12:15:08+5:30
तरुणी गर्भवती असल्याचे कळताच प्रियकराने तिला बळजबरीने गर्भपाताची गोळी खायला लावली. मात्र, यानंतर तिची प्रकृती बिघडू लागली.

प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
छत्तीसगडमधील सुरगुजा येथे एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही मुलगी ५ महिन्यांची गर्भवती होती. मात्र, तिच्या प्रियकराला कळताच त्याने तिला गर्भपाताचे औषध खायला लावले. यानंतर मुलीची तब्येत बिघडल्याने घाबरलेल्या प्रियकराने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलीची प्रकृती आणखीनच बिघडली. तिची ही अवस्था बघून प्रियकर रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.
मायापूरची रहिवासी असलेल्या या तरुणीचे गेल्या ५ वर्षांपासून तिच्या घरा शेजारी राहणाऱ्या गोलू नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. तरुणीच्या कुटुंबाला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती होती. ती अनेकदा तिच्या स्टेटसवर तिचा बॉयफ्रेंड गोलूसोबतचे फोटो पोस्ट करायची. तरुणी तिची बहीण आणि आईसोबत या गावात राहत होती.
तरुणीची तब्येत बिघडताच बॉयफ्रेंड पसार!
तरुणी गर्भवती असल्याचे कळताच प्रियकराने तिला बळजबरीने गर्भपाताची गोळी खायला लावली. मात्र, यानंतर तिची प्रकृती बिघडू लागली. तिची अवस्था पाहून घाबरलेल्या गोलूने, मामा आणि तरुणीच्या धाकट्या बहिणीची मदत घेऊन, तरुणीला अंबिकापूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, या तरुणीची प्रकृती अधिक खालावल्याचे लक्षात येताच, गोलू आणि त्याचा मामा दोघेही हॉस्पिटलमधून पळून गेले. रुग्णालयात मुलीसोबत फक्त तिची धाकटी बहीण थांबली होती. मात्र, उपचारांदरम्यान तरुणीचा मृत्यू झाला.
तरुणीच्या आईने केले आरोप
मृत तरुणीच्या आईने सांगितले की, त्यांच्या मुलीला अनेक लग्नाचे प्रस्ताव आले होते पण प्रत्येक वेळी ती म्हणायची की, तिला आत्ता लग्न करायचे नाही. आईने मुलीच्या प्रियकराला याचा दोष दिला. तरुणी गर्भवती हे माहीत असताना देखील गोलू तिच्याशी लग्न करण्यास तयार नव्हता. गोलू आणि त्याच्या मामाने मिळून आपल्या मुलीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोपही तरुणीच्या आईने केला आहे.
तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाची माहिती देताना सरगुजा अतिरिक्त एसपी अमोलक सिंह म्हणाले की, मृत तरुणीच्या आईने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.