गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:49 IST2025-12-17T15:47:34+5:302025-12-17T15:49:16+5:30
आईवडिलांची चिंता वाढवणारी घटना समोर आलीये. वर्गातील मुलांनी गणवेशावरून चिडवल्यामुळे एका चौथीत शिकणाऱ्या मुलाने थेट आयुष्यच संपवले.

गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
प्रशांत नेहमीप्रमाणे शाळेतून आला. गणवेश न बदलताच बाथरूममध्ये गेला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर आलाच नाही. मग घरच्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला. आतून काहीही प्रतिसाद आला नाही. मग दरवाजा तोडला आणि आतमध्ये दृश्य दिसले, ते बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हैदराबादमधील चंदानगर भागात ही घटना घडली.
मंगळवारी सायंकाळी प्रशांत जेव्हा शाळेतू परत आला, तेव्हा त्याने ना कपडे बदलले, ना बॅग काढून ठेवली. तो घरात आला, तसा बाथरूमध्ये गेला. बाथरूममध्ये गेल्यानंतर त्याने शाळेच्या आयडी कार्डला असलेल्या दोरीच्या मदतीने गळफास तयार केला आणि आत्महत्या केली.
बराच वेळ तो बाहेर आला नाही. मग घरच्यांनी त्याला आवाज दिला. आतून काहीच आवाज न आल्याने घरच्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी प्रशांत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला घरचे तातडीने रुग्णालयात घेऊन गेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून प्रशांतला मृत घोषित केले.
याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आला.
प्रशांतने आत्महत्या का केली?
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली आहे की, प्रशांत त्यांच्या वर्गातील मुलांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे त्रस्त होता. त्याच्या वर्गातील काही मुले त्याला सतत चिडवायचे. तू गणवेश नीट घालत नाहीस, म्हणून वर्गातील मुलं त्याला चिडवायची. त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलले.