रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 07:02 IST2025-08-08T07:00:57+5:302025-08-08T07:02:45+5:30
पुणे : रेव्ह पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रांजल खेवलकर याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अश्लील छायाचित्रांचा साठा आढळला असून हा ...

रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
पुणे : रेव्ह पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रांजल खेवलकर याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अश्लील छायाचित्रांचा साठा आढळला असून हा मानवी तस्करीचा प्रकार आहे. या पार्ट्यांमध्ये महिलांवर नशा देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. खेवलकर हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई असून, त्याची पत्नी रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.
या पार्ट्यांमध्ये महिलांवर नशा देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप चाकणकर यांनी केला. काही महिलांशी आपत्तीजनक चॅटिंगही करण्यात आले आहे. पीडितांमध्ये मोलकरणींचाही समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रकरणाचे गंभीर स्वरूप लक्षात घेता, विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपास करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाने केली. चाकणकर यांनी सांगितले की, खेवलकर याने एकूण २८ वेळा त्या हॉटेलमध्ये खोली आरक्षित केली असल्याची तक्रार आयोगाकडे आली होती. त्याची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रकरणाच्या तपासाबाबत आयोगाने पत्र दिले.
खेवलकरच्या मोबाइलमध्ये १,७४९ नग्न छायाचित्रे व चित्रफिती
खेवलकरच्या मोबाइलमध्ये हिडन फोल्डरमध्ये एकूण १,७४९ नग्न छायाचित्र व चित्रफिती असून, त्यामध्ये २३४ छायाचित्र आणि २९ चित्रफिती अत्यंत अश्लील आहेत. ही छायाचित्रे व चित्रफिती पीडित महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
महिलांना सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून लोणावळा, साकीनाका परिसरात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत होते. आणखी काही गोष्टी तपासामध्ये उघड होत आहेत. मानवी तस्करी विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अरूष नावाच्या एका व्यक्तीचा यातील सहभाग उघड होत असल्याची माहिती चाकणकर यांनी यावेळी दिली.