महाराष्ट्र एटीएसची दमदार कामगिरी; आंध्र प्रदेशकडून रोख बक्षिस जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 15:31 IST2019-09-19T15:16:59+5:302019-09-19T15:31:35+5:30
आंध्रप्रदेश सरकारने या माओवाद्यांवर असलेली बक्षिसाची रक्कम महाराष्ट्र एटीएसला देण्याचं जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र एटीएसची दमदार कामगिरी; आंध्र प्रदेशकडून रोख बक्षिस जाहीर
मुंबई - राज्यांतील काही जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घातला असताना या नक्षलवाद्यांवर कारवाईसाठी स्थानिक पोलीस ठाण्यांबरोबरच महाराष्ट्रएटीएसने पुढाकार घेतला आहे. अनेक नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळून महाराष्ट्रएटीएसने दमदार कामगिरी बजावली आहे. त्यातच आंध्र प्रदेश येथे मोस्टवाॅन्टेड असलेल्या ७ माओवाद्यांना पकडल्याप्रकरणी आंध्रप्रदेश सरकारने या माओवाद्यांवर असलेली बक्षिसाची रक्कम महाराष्ट्र एटीएसला देण्याचं जाहीर केलं आहे.
मागील अनेक वर्षांपासून आंध्र प्रदेशात घातपाताच्या कारवाया करणाऱ्या ७ माओवाद्यांवर तेथील सरकारने आठ लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. हे माओवादी मुंबईतील पूर्व उपनगरात लपून बसल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र एटीएसचे पोलिस उपायुक्त मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके, पोलीस निरीक्षक संजय मराठे, भास्कर कदम यांच्यासह पथकातील पोलिसांनी सापळा रचून या ७ माओवाद्यांना अटक केली होती. अटक माओवाद्यांमध्ये माओवादी नेता कृष्णा लिंगैय्या घोषका उर्फ वेणुगोपालन याचाही समावेश होता. माओवादी नेता वेणुगोपालन व्यतिरिक्त एटीएसने सत्य नारायन कर्रेल्ला, बाबू वांगुरी, शंकरय्या गुंडे, रवि मारमपेल्ली, रमेश गोलाला, नरसय्या जुम्पाला आणि सैदुल सिंगपंगा यांनाही अटक केली होती. वेणुगोपालनवर आंध्र प्रदेशमध्ये २०१२ पासून ८ लाखांचं बक्षीस सरकारने जाहीर केलं होतं. मुंबईत राहून हे माओवादी गुजरात आणि महाराष्ट्रातील माओवादी विचारधारणेतील तरुणांना एकत्र करून माओवादी संघटनांचा प्रचार आणि प्रसार वाढवण्याचे काम करत होते.