Power worker assault case: Former Pandharakavada MLA jailed | वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण : पांढरकवडाच्या माजी आमदाराला कैदेची शिक्षा

वीज कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण : पांढरकवडाच्या माजी आमदाराला कैदेची शिक्षा

ठळक मुद्देप्रथम श्रेणी न्यायालयाने ठोठावलेली ही शिक्षा गुरुवारी सत्र न्यायालयानेही कायम ठेवल्याने तोडसाम यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी केली.सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यातील एक साक्षीदार वीज कर्मचारी फितूर झाला.

पांढरकवडा (यवतमाळ) : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या लेखापालाला मारहाण करून शासकीय कामात हस्तक्षेप करणारे पांढरकवडा येथील भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रथम श्रेणी न्यायालयाने ठोठावलेली ही शिक्षा गुरुवारी सत्र न्यायालयानेही कायम ठेवल्याने तोडसाम यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी केली.


प्रकरण असे, मरकाम नामक व्यक्तीला विजेचे जादा बिल आले म्हणून राजू तोडसाम १७ डिसेंबर २०१३ रोजी पांढरकवडा येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी जाब विचारत असताना लेखापाल विलास आकोट यांना कॉलर पकडून शिवीगाळ, मारहाण केली. शासकीय कामात हस्तक्षेप करून जीवे मारण्याची धमकीही दिली. आकोट यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी भादंवि २९४, ३५२, ३५३, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंदविला. तत्कालीन ठाणेदार संजय खंदाडे यांनी तपास करून दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यातील एक साक्षीदार वीज कर्मचारी फितूर झाला.

पांढरकवडा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने २७ नोव्हेंबर २०१५ रोजी राजू तोडसाम यांना दोषी ठरवित भादंवि कलम २९४ मध्ये तीन महिने साधा कारावास व दहा हजार रुपये दंड व कलम ३५२ मध्ये तीन महिने कारावास व ५०० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या शिक्षेला तोडसाम यांनी सत्र न्यायालयात आव्हान देऊन स्थगनादेश मिळविला होता. पाच वर्षानंतर त्याचा निकाल लागला. गुरुवारी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. नाईकवाड यांच्या न्यायालयाने प्रथम श्रेणी न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यामुळे न्यायालयापुढे हजर असलेल्या राजू तोडसाम यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना कारागृहात पाठविले. याप्रकरणात तोडसाम यांच्यावतीने ॲड. गणेश धात्रक यांनी बाजू मांडली.

Web Title: Power worker assault case: Former Pandharakavada MLA jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.