‘टेरर फंडिंग’मागे राजकीय कनेक्शन; ‘त्या’ हस्तकांच्या संपर्कात राजकीय नेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 10:04 IST2022-05-14T09:46:17+5:302022-05-14T10:04:11+5:30
येत्या काळात काही बडे नेते यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘टेरर फंडिंग’मागे राजकीय कनेक्शन; ‘त्या’ हस्तकांच्या संपर्कात राजकीय नेते
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एनआयएने अटक केलेल्या डी गँगच्या दोन हस्तकांच्या संपर्कात अनेक राजकीय नेते मंडळी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडे राजकीय नेत्यांची लिस्ट असून, याबाबतही चौकशी करायची असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात काही बडे नेते यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डी गँगच्या टार्गेट लिस्टवर काही राजकीय नेते आणि बडी मंडळी होती, अशीही धक्कादायक माहिती समोर येत आहे. एनआयएने दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर, सरकारी वकील संदीप सदावर्ते यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये डी कंपनीचे धागेदोरे अनेक दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत. आरोपी आरीफ शेख आणि शब्बीर शेख यांचे काही संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. त्यांच्याकडून पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी डी कंपनीसाठी हवाला ॲापरेट करायचे. मुंबई पश्चिम उपनगरात डी कंपनीचे सर्व व्यवहार दोघे हाताळत होते. दोघेही छोटा शकीलच्या संपर्कात आहेत. छोटा शकील पाकिस्तानातून जे ‘क्रिमिनल सिंडिकेट’ चालवतो त्या ‘सिंडिकेट’मध्ये दोन्ही आरोपी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती सदावर्ते यांनी न्यायालयात दिली. तसेच, खंडणी, अमली पदार्थ तस्करी, दहशतवादी कृत्य यांत या दोन्ही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे आढळले असल्याचेही नमूद केले. हे दोन्ही आरोपी दाऊद आणि छोटा शकीलच्या संपर्कात होते, असे पुरावे एनआयएकडे आहेत.
१९९३ च्या बॉम्बस्फोटात निर्दोष
दोघेही १९९३ च्या बॉम्बस्फोटात निर्दोष सुटले होते. मात्र, त्यानंतरही त्यांचे डी गँगसाठीचे काम सुरू होते. याबाबत त्यांच्याकडे एनआयएकडून चौकशी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आरोपींनी कोर्टात गायले ‘सारे जहाँ से अच्छा’
दोन्ही आरोपींनी कोर्टात माहिती देताना आम्ही काहीही केलेले नाही, आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो, असे सांगत ‘सारे जहाँ से अच्छा’ हे देशभक्तीपर गीत म्हटले. तसेच, दोन्ही आरोपींनी सरकारी वकिलाची मागणी केली आहे.