पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:37 IST2025-10-30T12:37:15+5:302025-10-30T12:37:54+5:30
Police's post-mortem interference: फलटणच्या महिला डॉक्टरने पोलीस, खासदार पोस्टमार्टेम रिपोर्ट अहवाल बदलण्यास भाग पाडत असल्याचे आरोप केले होते. यानंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती.

पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी पोलीस, खासदार व त्यांचे पीए दबाव टाकत असल्याची तक्रार फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील मयत डॉक्टरने केली होती. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच तिकडे उत्तर प्रदेशच्या शामलीमध्येही बडे पोलीस अधिकारी कसे पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यास भाग पाडतात याचा कच्चाचिठ्ठाच डॉक्टरांनी जगासमोर मांडला आहे.
यामुळे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातून पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि एन्काउंटर प्रकरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चौधरी यांनी खोटे एन्काउंटर हे खरे आहे हे दाखवण्यासाठी पोलिस पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफार करण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. "पोलीस आरोपींना २० गोळ्या लागलेले मृतदेह घेऊन येतात आणि आम्हाला पोस्टमॉर्टम अहवालात केवळ एकाच जखमेचा उल्लेख करण्यास भाग पाडतात.", असा गंभीर आरोप चौधरी यांनी पोलीस ठाण्यासमोरील आंदोलनावेळी केला आहे.
प्रकरण काय...
डॉ. चौधरी यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या चोरीच्या घटनेत पोलिसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या ५ लाख रुपयांच्या चोरीच्या तपासाऐवजी पोलीस उलट त्यांनाच पैशाच्या स्रोताबद्दल विचारणा करत आहेत. चौधरी यांच्या आरोपांनुसार मृतदेहांवर गोळी लागलेल्या जखमेभोवती काळेपणा दिसतो. हे स्पष्टपणे सूचित करते की, गोळी अगदी जवळून झाडण्यात आली आहे. परंतू, या सर्व गोष्टी आम्हाला लपविण्यास सांगितल्या जातात. यासाठी पोलीस अधीक्षक देखील उभे राहून आमच्याकडून हे करवून घेतात. मानवाधिकार आयोगाने याची चौकशी करावी अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. तर या गंभीर आरोपांवर शामलीचे एस.पी. (अधीक्षक) एन. पी. सिंग यांनी हे आरोप 'निराधार' असल्याचे म्हटले आहे. पोस्टमॉर्टम डॉक्टरांच्या पॅनलद्वारे आणि अनिवार्य व्हिडिओग्राफीसह केले जाते, असे ते म्हणाले.