धूम स्टाईल लुटणारी टोळी केली पोलिसांनी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 21:27 IST2018-07-23T21:26:54+5:302018-07-23T21:27:27+5:30
गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ ने अटक केली

धूम स्टाईल लुटणारी टोळी केली पोलिसांनी अटक
मुंबई - मध्यरात्रीच्या वेळी एकट्याने जाणाऱ्या वाटसरूंना मोटारसायकलवरून येऊन हेरून जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या कक्ष - ४ ने अटक केली आहे. सुमंत उर्फ बंटी संजय शिंदे (वय - १८), सचिन विजय भालेराव (वय - १९) आणि अजय गौतम इंगळे (वय - २०) या तीन आरोपींना पोलिसांनी दादर टी. टी. येथील अटक केली आहे.
एकट्या - दुकट्या पायी जाणाऱ्या प्रवासशांना लुटणाऱ्या टोळीबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार काल मध्यरात्रीच्या वेळी सलग काही दिवस दादर व माटुंगा येथील रस्त्यावर पळत ठेवून आज मध्यरात्रीच्या वेळी दादर टी. टी. येथील बाहेर गावी जाणाऱ्या, येणाऱ्या बसेस थांबण्याच्या मार्गावर एक यामाहा एफ झेड मोटार सायकलवरून तीन तरुण संशयास्पदरित्या घिरट्या घालत असल्याचे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी या तीन तरुणांना दादर टी. टी. येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर अडवून ताब्यात घेतले. या तरुणांकडे ड्राईव्हिंग लायसन्स नसून त्यांना त्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले असता अधिक चौकशीअंती त्यांच्याविरोधात सायन, दादर, कुर्ला रेल्वे टर्मिनस, पंतनगर, नेहरूनगर आदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे.