मिरा रोडमध्ये १९ बारबाला पोलिसांच्या ताब्यात; पळून जाण्यासाठी ‘अलर्ट बेल’ वाजविली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:53 IST2026-02-13T06:53:16+5:302026-02-13T06:53:52+5:30
सहायक निरीक्षक प्रवीण भोसले यांसह पोलिस निरीक्षक जिलानी सय्यद व पोलिस पथकाने बारमध्ये छापा टाकला असता पुरुष ग्राहक मोठ्या संख्येने होते.

मिरा रोडमध्ये १९ बारबाला पोलिसांच्या ताब्यात; पळून जाण्यासाठी ‘अलर्ट बेल’ वाजविली, पण...
मिरा रोड : मिरा रोड येथील एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारबालांचे अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्तांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री बारवर छापा टाकला. यावेळी बारच्या प्रवेशद्वारवरील कर्मचाऱ्यांनी अलर्ट बेल वाजवून बारबालांना पळून जायचा इशारा केला. मात्र, पोलिसांनी पळण्याचे मार्ग रोखून १९ बारबालांना ताब्यात घेतले. याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सिल्व्हर पार्क नाका येथील चंद्रेश अकोर्ड इमारतीच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर व्हाईट हाऊस ऊर्फ खुशी पॅलेस या नावाने ऑर्केस्ट्रा बार सुरू होता. निवासी इमारतीतील बारचा पहिला मजला हा निवासी सदनिका तोडून बार केला आहे.
मिरा राेड शहरातील अन्य बारमालकांना इशारा
या ठिकाणी अश्लील नृत्य व जास्त बारबाला असल्याची माहिती मिरा-भाईंदर परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांना मिळाली. त्यांनी त्याची खात्री करून कारवाई करण्यास मिरारोड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण भोसले यांना निर्देश दिले होते. यानुसार धडक कारवाई करून पोलिसांनी बारमधील कृत्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे.
बारबालांचे तोकड्या कपड्यांमध्ये नृत्य
सहायक निरीक्षक प्रवीण भोसले यांसह पोलिस निरीक्षक जिलानी सय्यद व पोलिस पथकाने बारमध्ये छापा टाकला असता पुरुष ग्राहक मोठ्या संख्येने होते.
शासनाच्या नियमानुसार बारमध्ये गायिका आदी नावाने केवळ सात महिलांना ठेवण्यास परवानगी असताना १९ बारबाला तोकड्या कपड्यांमध्ये आढळल्या. बारमधील रोख रक्कम, दारूच्या बाटल्या असा ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरारोड पोलिस ठाण्यात गुरुवारी बारचा मालक - चालक सत्यहास शेट्टी, उमेश शेट्टी, शिवा शेट्टी, दीपक यादव, जितूसह एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता अधिक तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.