गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणारा पोलीस अधिकारी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 21:12 IST2020-12-19T21:10:26+5:302020-12-19T21:12:11+5:30
Bribe Case : नाशिक एसीबीची कारवाई : एमआयडीसी पोलीस ठाण्यातील घटना

गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागणारा पोलीस अधिकारी अटकेत
जळगाव : रायपुर येथील दोन गटात झालेल्या वादात दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप अशोक हजारे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सायंकाळी अटक केली. सकाळी ११ वाजेपासून सुरु असलेली कारवाईची प्रक्रीया रात्री आठ वाजेपर्यंत सुरु होती. याप्रकरणी हजारे यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून फेकले, वरळीतील युवकाची पैशांसाठी नेरळ येथे पती-पत्नीने केली निर्घृण हत्या
रायपुर, ता. जळगाव येथे दीड महिन्यापूर्वी दोन गटात वाद झाला होता. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन मारहाण, दंगल व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास सहायक निरीक्षक संदीप हजारे यांच्याकडे होता. याप्रकरणात मदत करण्यासाठी हजारे यांनी संबंधित व्यक्तीकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तरुणाने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, हवालदार सचिन गोसावी, मनोज पाटील, किरण अहिरराव व जाधव यांच्या पथकाने शनिवारी जळगाव गाठून तक्रारदार व हजारे यांची चौकशी केली. तांत्रिक पुरावे उपलब्ध झाल्याने हजारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली. ज्या पोलीस ठाण्यात हजारे कार्यरत होते, त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन कोठडीत जाण्याची वेळ हजारे यांच्यावर आली.