Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:20 IST2025-06-25T17:19:42+5:302025-06-25T17:20:14+5:30
Raja Raghuvanshi Murder Case: पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.

Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. इंदूरमधील एका नाल्यात आरोपी सोनम रघुवंशीचा लॅपटॉप सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक सोनमच्या लॅपटॉपचा शोध होते. ओल्ड पलासियाजवळील नाल्यात शोध घेत असताना पोलिसांना एक पिस्तूलही सापडली. ही तीच पिस्तूल आहे, जी आरोपीने राजाला मारण्यासाठी खरेदी केली होती.
सोनमचा लॅपटॉप सापडला
मिळालेल्या माहितीनुसार, सोनमचा लॅपटॉप नाल्यात फेकल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळपासून इंदूर पोलिसांनी याचा शोध सुरू होता. दरम्यान, आज पोलिसांनी तिन्ही आरोपींना (लोकेंद्र, शिलोम आणि बल्लू) समोरासमोर आणले. पहिल्यांदा आरोपी लोकेंद्र आणि शिलोमची कसुन चौकशी करण्यात आली. त्यानंतर चौकीदार बल्लूचीही सखोल चौकशी केली. पोलिसांच्या हाती लॅपटॉप आणि पिस्तुल लागल्याने या प्रकरणात महत्वाचे खुलासे होण्याची अपेक्षा आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
इंदुरचा रहिवासी राजा रघुवंशी(२९ वर्षे) आणि त्याची पत्नी सोनम हनीमुनसाठी मेघालयला गेले होते. यादरम्यान, सोनमने प्रियकराच्या मदतीने २३ मे २०२५ रोजी मेघालयातील शिलोंग येथे राजाची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आरोपी पत्नी सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर तीन आरोपी विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांच्यासह आतापर्यंत आठ आरोपींना अटक झाली आहे.
नार्को चाचणीची मागणी
राजाचा भाऊ विपिन रघुवंशी याने दावा केला आहे की, सोनम आणि राज कुशवाहा हे फक्त मोहरे आहेत. खरे कट रचणारे अद्याप पुढे आलेले नाहीत. कुटुंबाने सोनम आणि राजची नार्को चाचणी करण्याची मागणी केली होती, ती फेटाळण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, जे त्यांना शिक्षा होण्यासाठी पुरेसे आहेत. अशा परिस्थितीत नार्को चाचणीची आवश्यकता नाही.
नवीन पात्रांची एन्ट्री
अलीकडेच, लोकेंद्र सिंग तोमर, प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स आणि सुरक्षा रक्षक बलवीर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पुरावे लपवण्याचा आणि सोनमला आश्रय दिल्याचा आरोप आहे. याशिवाय, सोनमची जवळची मैत्रीण अलका हिचे नावही समोर आले आहे.