बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 17:11 IST2025-08-15T17:11:02+5:302025-08-15T17:11:26+5:30
७ ऑगस्टला इंदूरहून कटनीला नर्मदा एक्सप्रेसने चाललेली अर्चना तिवारी चालत्या ट्रेनमधून अचानक गायब झाली

बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
मध्य प्रदेशात सध्या चर्चेत असणारे अर्चना तिवारी बेपत्ता प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. अर्चनाच्या शोधासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न सुरू केलेत. अर्चनाचा शोध घेण्यासाठी ६ टीम बनवण्यात आल्या आहेत. मागील ८ दिवसांपासून अर्चना तिवारी गायब आहे. त्यामुळे तिचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
एक टीम इंदूरच्या त्या हॉस्टेलमध्ये जाणार, जिथे अर्चना राहत होती. तिथल्या सहकारी मुलींची पोलीस चौकशी होईल. त्यातून काही महत्त्वाची माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरी टीम नर्मदा एक्सप्रेसने जाणाऱ्या सर्व मार्गावरील रेल्वे स्टेशनवर तपास करेल. त्यात प्रवाशी, स्टाफची चौकशी होईल.ज्यादिवशी अर्चना बेपत्ता झाली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील. त्याशिवाय पोलीस इटारसी-कटनी रेल्वे ट्रॅकवरही कसून शोध घेत आहे. जीआरपी, आरपीएफ टीम सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यामाध्यमातून काही सुगावा हाती लागतो का हे पाहत आहेत.
८ दिवसांपासून थांगपत्ता नाही...
७ ऑगस्टला इंदूरहून कटनीला नर्मदा एक्सप्रेसने चाललेली अर्चना तिवारी चालत्या ट्रेनमधून अचानक गायब झाली. ती इंदूर येथे सिव्हिल जजची परीक्षा तयारी करत होती. अर्चना बी-३ कोचच्या ३ नंबरच्या जागेवरून प्रवास करत होती. तिचे अखेरचे लोकेशन भोपाळच्या रानी कमलापती स्टेशनवर रात्री १०.१६ मिनिटांनी आढळले. त्यानंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचं सांगितले जाते. ८ दिवसांपासून मुलगी बेपत्ता आहे आणि तिचा काहीच शोध लागत नसल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत आहे.
दरम्यान, अर्चना कुणासोबत पळून जाऊ शकत नाही. तिच्यासोबत काहीतरी अघटित घडले असावे. आम्ही तिला परत घेऊन येणारच असं अर्चनाचा भाऊ अभयने सांगितले आहे. अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागे कुटुंबाने ५ जणांवर संशय व्यक्त केला आहे परंतु त्याबाबत पोलिसांनी पुष्टी केली नाही. सध्या अर्चनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.