कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 23:58 IST2025-12-15T23:57:26+5:302025-12-15T23:58:18+5:30
१०० कोटींचे एमडी ड्रग विक्री तर १०० कोटींचे एमडी व साहित्य जप्त

कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
मीरारोड: मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी राजस्थानच्या झुनझुनु येथून कोंबडी पालनाच्या आड चालणारा एमडी या अमली पदार्थांचे उत्पादन करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. पोलिसांनी एकूण ११ आरोपींना अटक केली असून त्यात दाऊद टोळीतील गुंडांचा सहभाग आहे. १०० कोटींचे एमडी व साहित्य जप्त केले असून या कारखान्यातून १०० कोटींच्या एमडीची पश्चिम भारतात विक्री झाल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
४ ऑक्टोबरला मीरारोड भागात अमली पदार्थ विरोधी कक्ष १ ने एमडी अर्थात मेफेड्रोन अमली पदार्थ विक्री प्रकरणी ६ जणांना अटक केली. १ कोटी ३२ हजारांचा अर्धाकिलो एमडी, १ ८६ हजारांचे ८ मोबाईल व ४ लाख १० हजार किमतीच्या ४ दुचाकी त्यांच्याकडून जप्त केल्या होत्या. अटक आरोपींच्या तपासातून आणखी ४ आरोपींना अटक करून २० लाख किमतीच्या २ कार, १ दुचाकी व २ लाखांचे ६ मोबाईल जप्त केले होते. गुन्ह्याचा तपास मीरा भाईंदर अमली पदार्थविरोधी शाखा १ आणि कक्ष २ चे पोलीस आणि सायबर पोलीस संयुक्तपणे करत होते.
गुन्ह्यातील अटक आरोपींची चौकशी व त्याची साखळी शोधत पोलिसांना राजस्थानच्या झुनझुनू मधून अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याचा सुगावा लागला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक गेल्या आठवड्याभरा पासून झुनझुनु येथे तळ ठोकून होते. त्यांनी आपण ड्रॅग डीलर असल्याचे सांगून एमडी पुरवठादारच्या संपर्काच्या प्रतीक्षेत सापळा रचून होते. अखेर १४ डिसेंबरला एमडीचा साठा घेऊन विक्रीस आलेला हाती लागला व पोलिसांनी कोंबडी पालनच्या मोठ्या अवाढव्य शेड मधील बांधकामात चालत असलेला एमडी उत्पादनाचा कारखाना शोधून काढला.
सोमवारी पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी पत्रकारांना माहिती दिली कि, झुनझुनु, राजस्थान येथे आरोपी अनिल विजयपाल सिहाग ह्याला अटक करून पोल्ट्रीफार्म मध्ये चालणारा एमडी ड्रग्स बनविण्याचा कारखाना उध्वस्त केला गेला. सुमारे १० किलो एमडी ड्रग्स, एमडी चे प्री-कर्सर रसायने तसेच एमडी ड्रग्स बनविण्याची आवश्यक फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, वजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ साधनसामुग्री असा एकुण रुपये १०० कोटी किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. गेल्या वर्षभरापासून हा कारखाना चालत असल्याचा व नुकतेच १०० कोटींचे अमली पदार्थ हे पश्चिम भारतात येथून पुरवले गेल्याचा संशय आयुक्तांनी वर्तवला. यातील अटक ११ पैकी ९ आरोपी हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले आहेत. ह्यातील काहीजण हे डी गँगशी संबंधित आहेत. हत्या, दहशतवादी कृत्य पासून विविध गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. ह्यात आणखी तपास सुरु आहे असे आयुक्तांनी सांगितले.