कामोठे भीषण अपघाताप्रकरणी आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 14:39 IST2019-07-22T14:37:47+5:302019-07-22T14:39:14+5:30
अपघाताचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

कामोठे भीषण अपघाताप्रकरणी आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
पनवेल - कामोठे अपघातात प्रकरणी आरोपी स्कोडा चालक हरविंदरसिंग हरभजन मटारु (७५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात केल्यानंतर तब्येत बिघडल्याने आरोपी पनवेलमधील लाईफ लाईन रुग्णालायत दाखल झाला होता. आज कामोठे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याचे कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास सोनावणे यांनी माहिती दिली. काल रात्री ८.१५ च्या दरम्यान झालेल्या अपघाताचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये स्कोडा चालकाने धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
काल रात्री कामोठे शहरात सेक्टर ६ मध्ये कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं मोठा अपघात झाला. कारनं अनेक वाहनांना धडक देत पादचाऱ्यांना उडवल्याची घटना काल रात्री ८.१५ च्या सुमारास घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. एमएच 01 बीएफ 993 या स्कोडा कारनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर होती. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर उर्वरित चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.