शरीराला स्पर्श केला अन् अन् छातीपर्यंत...; ट्रेनमध्ये हवालदाराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; व्हिडिओमुळे नराधम गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:03 IST2025-12-25T16:54:15+5:302025-12-25T17:03:16+5:30
धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे.

शरीराला स्पर्श केला अन् अन् छातीपर्यंत...; ट्रेनमध्ये हवालदाराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; व्हिडिओमुळे नराधम गजाआड
Law Student Traps Cop: जनतेच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांच्याकडून अत्याचार सुरु असल्याच्या घटना सध्या देशात घडत आहे. असाच काहीसा संतापजनक प्रकार तामिळनाडूमध्ये घडला आहे. धावत्या ट्रेनमध्ये एका पोलीस हवालदाराने शेजारी बसलेल्या कायद्याच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या विद्यार्थिनीने न घाबरता या सर्व कृत्याचे व्हिडिओ शूटिंग केले आणि त्या पुराव्याच्या आधारे पोलीस हवालदाराला गजाआड केले.
पीडित तरुणी ही कायद्याचे शिक्षण घेत असून ती कोईम्बतूरला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होती. यावेळी तिच्या शेजारच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती. काही वेळानंतर या व्यक्तीने पीडित विद्यार्थिनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. शेजारी बसलेली व्यक्ती कोणतीही भीती न बाळगता वारंवार विद्यार्थिनीच्या शरीराला आणि छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती.
सुरुवातीला या प्रकाराने तरुणी धक्का बसला, पण तिने प्रसंगावधान राखले. गोंधळून न जाता तिने गुपचूप आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला. त्या पोलीस कर्मचाऱ्याची प्रत्येक घाणेरडी हालचाल तिने मोबाईलमध्ये कैद केली. नराधम हवालदार इतका बेसावध होता की, आपले कृत्य रेकॉर्ड होत आहे याची त्याला पुसटशी कल्पनाही आली नाही.
ट्रेन थांबवून आरोपीला अटक
व्हिडिओच्या स्वरूपात ठोस पुरावा हाती आल्यानंतर विद्यार्थिनीने तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून कोईम्बतूरला जाणारी ट्रेन अरक्कोणम रेल्वे स्टेशनवर तातडीने थांबवण्यात आली. रेल्वे पोलिसांनी तत्काळ डब्यात प्रवेश करून आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीची ओळख शेख मोहम्मद अशी पटली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी आर.एस. पुरम पोलीस स्टेशनमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवतात, तेव्हा सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थिनीच्या धैर्याचे कौतुक
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या कायद्याच्या विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक केले आहे. अनेक वेळा अशा घटनांमध्ये महिला घाबरून गप्प बसतात, मात्र या तरुणीने दाखवलेल्या धाडसामुळे एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलिसाचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.